Video - शिकलेल्यांना देव बुध्दी देवो! कोरोनाबाबत शेतात राबणाऱ्या महिलांचा सल्ला

सुनील पाटील 
गुरुवार, 9 एप्रिल 2020

एका शेतात काही महिला उसाच्या शेतामध्ये खुरपणीचे काम करत होत्या. सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत यांच्या कामाची वेळ. सकाळी अकरा वाजता घरातून आणलेले जेवण घेत असतानाही एकमेकींमध्ये अंतर सोडायला त्या विसरल्या नाहीत.

कोल्हापूर : कोरोनामुळे शासन आपल्या काळजीसाठी ऐकमेकांमध्ये अंतर ठेवायला सांगतयं. आम्ही शेतात राबतो, तरीही तोंडाला मास्क आणि उसाची सरी भांगलताना (खुरपणी) एकमेकींमध्ये तीन ते चार फुट अंतर ठेवतो. पण शिकलेल्या शहाण्यांना हे ज्ञान कोण देणार? देवच त्यांना बुध्दी देवो, असे आवाहन करुन शेतात काम करणाऱ्या महिलांनी कोरोनाबाबत लोकांना आवाहन केले. 

पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील एका शेतात काही महिला उसाच्या शेतामध्ये खुरपणीचे काम करत होत्या. सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत यांच्या कामाची वेळ. सकाळी अकरा वाजता घरातून आणलेले जेवण घेत असतानाही एकमेकींमध्ये अंतर सोडायला त्या विसरल्या नाहीत. उन्हात काम करुन रापलेले चहेरे, शेतात उगवलेले अनावश्‍यक तण काढून काळ्या मातीने मळलेले हात, हाताला उसाचा पाला कापू नये म्हणून घरातील पुरूषांचा फाटलेला शर्ट अंगात घालून या स्वत:ला अज्ञानी समजणाऱ्या शेतकरी महिला शेतात बसून जगाचे ज्ञान सांगत होत्या. सगळं डोळ्याने बघूनही लोक डोळ्यावर पट्टी बांधाल्यासारखे वागतात. खेड्यातील लोकांना कोरोना कशानं बरा होतो हे माहिती नाही. तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधावा आणि लोकांमधील एकमेकांमध्ये अंतर ठेवावे ऐवढं समजतं. सुरक्षित अंतर ठेवून आपला दैनंदिन व्यवहार किंवा शेतातले काम केल्यास आम्हाला काहीही होणार नाही. दक्षता घेणे हेच आपल्या हातात आहे. याची ज्याला जाणीव होईल तोच माणूस किंवा महिला सुरक्षित राहिल. गाय-म्हशीच्या धारा काढून संस्थेतसुध्दा पांढऱ्या रंगाच्या चौकोणात उभं राहूनच दुध घालतो. शेतीची कामे थांबवून चालत नाहीत. गेल्यावर्षी पुरामूळे मोठा फटका बसला. आता घरातून बाहेर पडून चालणार नाही. सरकारने शेतकऱ्यांना सवलत दिली आहे. त्याचा गैरफायदा अजिबात घेत नसल्याचेही ही शेतकरी माऊली सांगण्यास विसरली नाही. 

हे पण वाचा - उपचारासाठी 60 कि.मी.पर्यंत प्रवास 

आमच्या सारख्या अज्ञानी बायांनी हे सांगणे बरोबर नाही. पण, शिकलेल्यांना समजच नसल्यासारखी वागतात, अशांना देवाने बुध्दी द्यावी असे आवाहनही या महिलांनी केले. 

सकाळी सात वाजता घर सोडून शेतात आलो आहे. येताना तोडांला मास्कही लावला आहे. काम करतानाही आमच्या चार-पाच जणीमध्ये तीन-चार फुटांचे अंतर राहिल याची काळजी घेतोय. आता शिकलेल्यांनीही असं करावं म्हणंजे झालं. जेवतानाही आम्ही एकमेकींपासून लांब-लांब बसलो आहे. -

-रुक्‍मिणी पांडुरंग पाटील ,पाडळी खुर्द, ता. करवीर 

 

हे पण वाचा - ब्रेकिंग-  तो ठरला रत्नागिरीत कोरोनाचा पहिला बळी....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: social distancing farmer workers kolhapur corona virus