esakal | फ्लॅशबॅक : आदरयुक्त दरारा म्हणजेच बाबासाहेब कसबेकर!

बोलून बातमी शोधा

special article of sambhaji gandmale flashback kolhapur story of baba saheb kasabekar}

केवळ कोल्हापुरातीलच नव्हे, तर इचलकरंजीतील काही नेते मंडळीही यावेळी या साऱ्या सदस्यांवर ‘वॉच’ ठेवून होती.  

फ्लॅशबॅक : आदरयुक्त दरारा म्हणजेच बाबासाहेब कसबेकर!
sakal_logo
By
संभाजी गंडमाळे

कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुका आणि त्यानंतरच्या पदाधिकारी निवडीच्या निमित्ताने आजही आवर्जुन ज्यांच्या कार्याच्या स्मृतीला उजाळा मिळतो, ते म्हणजे कोल्हापूरचे पहिले महापौर बाबासाहेब कसबेकर. महापौरपदाची शान काय असते आणि या पदाचा आदरयुक्त दरारा काय असतो, याचा वस्तुपाठच कसबेकर यांनी आपल्या कार्यातून घालून दिला होता. ते महापालिकेत आल्यापासून बाहेर पडेपर्यंत महापालिकेतील वातावरण अगदी चिडीचूप असायचे. याबाबतच्या आठवणी ज्येष्ठ मंडळी आवर्जुन सांगतात.

कोल्हापूर महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक २० मे १९७८ ला झाली. त्यावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डी. टी. जोसेफ होते आणि त्यांच्याकडेच महापालिकेच्या आयुक्तपदाचाही चार्ज होता. सार्वत्रिक निवडणूक झाली आणि त्यानंतर महापौर निवडीची प्रक्रिया सुरू झाली; मात्र न्यायालयीन याचिकांमुळे महापौर निवडीसाठी अडीच महिने गेले. १६ ऑगस्टला पहिले महापौर म्हणून बाबासाहेब कसबेकर यांची निवड झाली; मात्र या निवडीमागची कथाही रंजक आहे. कारण ३१-२९ अशी बहुमताची स्थिती होती आणि त्यामुळेच नवनिर्वाचित सदस्यांना सहलीवर पाठवून त्यांच्या सुरक्षेवरही अधिक भर दिला गेला होता. केवळ कोल्हापुरातीलच नव्हे, तर इचलकरंजीतील काही नेते मंडळीही यावेळी या साऱ्या सदस्यांवर ‘वॉच’ ठेवून होती.  

हेही वाचा - भरवस्तीत चोरीचा प्रकार ; दरवाजा तोडून भामट्याने ४ लाखांचा ऐवज केला लंपास -

बाबासाहेब कसबेकर महापौरपदी विराजमान झाले आणि महापौरपदाचा दरारा काय असतो, याची प्रचिती महापालिका अनुभवू लागली. ते महापालिकेत आले की, सगळीकडे शांतता असायची. जो तो आपापल्या कामात व्यस्त असायचा. ते गाडीतून उतरून महापौर कक्षात जाईपर्यंत सारी मंडळी आहे त्या ठिकाणी उभी राहायची. विजार, शर्ट आणि कोट असा साधा पेहराव; पण सामान्य लोकांना खोळंबून ठेवणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांना त्यांनी त्यांच्या स्टाईलनेच सरळ केले. त्यांच्या कामाची पद्धतही पूर्णपणे पारदर्शक.

आपल्या हातून महापौरपदाला गालबोट लागेल अशी एकही गोष्ट होणार नाही, याची दक्षता त्यांनी घेतली. त्यामुळे प्रशासनातील सर्वच घटकांना आपण चुकलो तर आपल्या चुकीला माफी नाही, असा संदेश आपसूकच गेला. महापौर म्हणजे शहराचा प्रथम नागरिक; पण शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला निमंत्रण दिले नाही म्हणून त्यांनी थेट या समारंभावरच बहिष्कार घातला होता. प्रश्‍न कुणा व्यक्तीचा नसून शहराच्या प्रथम नागरिकाचा सन्मान महत्त्वाचा असल्याची स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी घेतली होती. एकूणच त्यांच्या कामाचा हा दरारा आजही अनेकांच्या स्मरणात आहे. किंबहुना, ‘आदरयुक्त दरारा म्हणजेच बाबासाहेब कसबेकर’ असेही मंडळी आवर्जून सांगतात.   

हेही वाचा -  कोल्हापूर : मतदार यादी बिनचूक करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न -

स्मृती चिरंतन जपल्या

बाबासाहेब कसबेकर यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात, यासाठी महापालिकेने त्यांचा पुतळा महापालिकेच्या आवारात उभारला; पण त्यानंतर पुतळ्याची अवहेलना होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आणि पुतळ्याची जागा बदलण्याची मागणी होऊ लागली. त्यामुळे १५ ऑगस्ट २०१६ रोजी पुन्हा महापालिकेच्या मुख्य चौकात या पुतळ्याची पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली.