"स्पेशल' मुलांचे सुप्तगुण ओळखण्यासाठी यांची आहे गरज

 "Special" children need to be recognized for their latent qualities
"Special" children need to be recognized for their latent qualities

कोल्हापूर ः मी व पती दोघेही शिक्षक. मुलगी बौध्दिक अक्षम. मात्र, तिच्यासाठी पाहिजे तसा वेळ कधी देताच आला नाही. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे मात्र आमचा सारा वेळ तिच्यासाठीच दिला आणि या साऱ्या दिवसात आम्हांला तिच्यातील अनेक सुप्तगुण पहिल्यांदाच उमगले. विशेष मुलांकडूनही मोबाईलचा प्रभावीपणे वापर करून घेत त्यांच्या आत्मनिर्भरतेच्या लढाईला बळ देता येते, याची यशस्वी शिकवणीही याच काळात मिळाली आणि मुलीनेही मोबाईलवरचे व्हिडिओ पाहून असंख्य कलाकृती, पाककृतींचा आनंद आम्हांला दिला...वैशाली कोळी आपल्या मुलीबद्दल भरभरून सांगत असतात आणि त्याचवेळी विशेष मुलं आणि पालकांतील वाढलेल्या सुसंवादाची झलकही अनुभवायला मिळत असते. 

वैशाली कोळी या एक प्रातिनिधीक उदाहरण. पण, जिल्ह्यातील नऊशे ते हजारहून अधिक विशेष मुलांच्या पालकांचाही हाच अनुभव आहे आणि शाळा बंद असल्या तरी अधून मधून होणाऱ्या छोटेखानी समारंभातून ते आपले हे अनुभव शेअर करत आहेत. आपल्या "स्पेशल' मुलांचा आम्हांला अभिमान आहे, असे ते आवर्जुन सांगतात. 
विशेष मुलांच्या शाळा सुरू करण्याबाबत अद्यापही कोणताच निर्णय झालेला नाही. मात्र, या शाळांतील शिक्षकांनी पालकांच्या माध्यमातून या विशेष मुलांना सतत नवनिर्मितीच्या विविध कामांत व्यस्त ठेवले आहे. मुळात कोरोनाचा संसर्ग बळावत असताना अशा मुलांची विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन वारंवार केले गेले. मात्र, या शाळांतील शिक्षकांचे ऑनलाईन मार्गदर्शन आणि पालकांनी मुलांसाठी दिलेला पूर्णवेळ यामुळे कोरोनाच्या संकटावरही त्यांनी यशस्वीपणे मात केली आहे. 

आठ संस्थांचे योगदान... 
कोल्हापूर शहराचा विचार केला तर शहरात बौध्दिक अक्षम अर्थात विशेष मुलांच्या तीन शाळा आहेत तर जिल्ह्यात एकूण चार शाळा व एक वसतिगृह अशा एकूण आठ संस्थांच्या माध्यमातून या मुलांच्या आत्मनिर्भरतेसाठी प्रयत्न सुरू आहेत. इतर शाळांप्रमाणेच या शाळाही गेल्या नऊ महिन्यांपासून बंद आहेत. मात्र, विविध स्पर्धा आणि उपक्रमांतून या मुलांची शाळेशी जुळलेली नाळ तुटणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. दिवाळीच्या काळात मुलांकडून आकाशकंदिल, पणत्या असे दिवाळीचे विविध साहित्य घरातूनच या शाळांनी तयार करून घेतले आणि त्याची विक्रीही चांगली झाली. नववी ते बारावीचे वर्ग हळूहळू सुरू होवू लागले आहेत. मात्र, प्राथमिक शाळा सुरू झाल्यानंतरच विशेष मुलांच्या शाळाही सुरू होतील, अशी शक्‍यता आहे. 

संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com