गिर्यारोहन, ट्रेकींगसाठीही विशेष नियमावली 

Special rules for mountaineering and trekking
Special rules for mountaineering and trekking

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आता गिर्यारोहन आणि ट्रेकींगसाठीही विशेष नियमावली तयार केली जाणार असून दहा दिवसात त्यासाठीचा अंतिम मसुदा शासनाला सादर करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

अखिल महाराष्ट्र गिर्यारोहन महासंघाच्या वतीने राज्यभरातील भटकंती करणाऱ्या व्यक्ती व संस्थांकडून सुचना मागवल्या असून त्यावर आधारित हा मसुदा असेल. दरम्यान, महासंघाने या कामासाठी नेमलेल्या नऊ जणांच्या तज्ञ समितीत येथील मैत्रेय प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. अमर अडके यांचा समावेश आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भटकंतीवर होणारे दूरगामी बदल, निसर्गावर होणारे दुष्परिणाम, वैयक्तिक आणि सामूहिक परिणाम अशा विविध अंगांनी राज्यभरातून महासंघाकडे सुचना आल्या आहेत. नऊ जणांची तज्ञ समिती त्यावर सध्या त्यावर काम करते आहे. ही समिती मसुदा तयार करेल आणि महासंघाला सादर करेल. महासंघ त्यावर आधारित अंतिम मसुदा तयार करून तो शासनाच्या संबंधित सर्व विभागांना देणार आहे. 

लॉकडाऊनमध्ये शिथीलता आल्यानंतर आता हळूहळू सर्व व्यवहार सुरू होत आहेत. भटकंतीबाबतही योग्य ती खबरदारी घेवूनच पुढील निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण केवळ हौसच नाही तर आता व्यावसायिकदृष्ट्या मोहिमांचे आयोजन करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्याशिवाय या मोहिमा म्हणजे आरोग्याची खऱ्या अर्थाने जोपासना असून त्यात तरूणाईचा सहभाग वाढला आहे. त्यामुळे शासनाला मसुदा सादर केल्यानंतर लवकरात लवकर विशेष नियमावली जाहीर करून भटकंतीसाठी परवानगी द्यावी, यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी सांगितले. 

पन्हाळा-पावनखिंड मोहिमेपासूनच राज्यभरात विविध मोहिमांना प्रारंभ होतो. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर विशेष नियमावली जाहीर करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण या नियमावलीवर आधारित किती लोकांचा सहभाग, शारिरीक अंतर अशा सर्व गोष्टींचा विचार करूनच मोहिमांची पुनर्मांडणी करावी लागणार आहे. 
- डॉ. अमर अडके 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com