जीवनात संकटे येणार तरी किती? आई-वडिलांचे छत्र हरपले, दृष्टी गेली, तरीही धनंजय लढतो आहे नियतीशी

नंदिनी नरेवाडी-पाटोळे
Saturday, 28 November 2020

आयुष्याशी लढताना धनंजयला हवे पाठबळ 

कोल्हापूर :  नियतीने त्याच्या आई-वडिलांना हिरावले आणि एकाकीपण वाट्याला आले. अशात अजाणत्या वयात त्याची दृष्टी हिरावली. तरी या संकटावर मात करत तो अगरबत्ती विकत स्वतःहून स्वावलंबी जीवन जगत होता; पण नियती आणखी कठोर झाली. एका अपघातामुळे कर्करोगसदृश मौखिक विकाराने त्याला घेरले. तपासण्या झाल्या आणि उपचाराचा खर्च पेलणार कोण, असा बाका प्रश्‍न समोर उभा ठाकला आणि त्याच्या समोरील अंधार अधिकच गडद झाला. ही करुण कहाणी आहे, दिलबहार तालमीजवळील धनंजय परमाळे याची.

धनंजय रामचंद्र परमाळे हा अवघ्या बावीस वर्षांचा. वडील रंगकाम, तर आई धुण्याभांड्याची कामे करून चरितार्थ चालवत होते. धनंजय सहा महिन्यांचा असताना तापाचे निमित्त झाले आणि डोळ्यांच्या नसा बधीर झाल्या. जग पाहण्यापूर्वीच दृष्टी हिरावली. दृष्टी हिरावली, तरी धनंजय स्वावलंबी बनण्यासाठी प्रयत्न करू लागला. सहा वर्षांचा असतानाच अपघातात आईचे निधन झाले. हा धक्का सहन करतच तो वडिलांसोबत राहू लागला. 

अगरबत्ती विकण्याचे काम करत त्याने स्वतःची जबाबदारी स्वतः उचलली. शाहू मैदानाजवळील खाऊ गल्लीत रोज अगरबत्त्या विकणे, हा त्याचा नित्यक्रम झाला होता. कधी- कधी रेल्वेतही अगरबत्त्या विकून वडिलांना हातभार लावायचा. सर्व काही सुरळीत असताना गेल्याच वर्षी वडिलांनीही त्याची साथ सोडली. वडिलांच्या दुःखात मित्र जितेंद्र डफळे यांनी त्याला सावरले. पुन्हा अगरबत्ती विक्रीचे काम सुरू झाले. अवघ्या काही महिन्यांत लॉकडाउनची घोषणा झाली आणि त्याचे काम थांबले.

हेही वाचा- पुणे पदवीधर निवडणूक प्रचाराची खुन्नस सोशल मीडियावर

लॉकडाउन काळात कसाबसा उदरनिर्वाह चालवला. लॉकडाउनमध्ये शिथिलता आणल्यानंतर काळजी घेतच अगरबत्ती विक्रीचे काम करू लागला; परंतु त्याचा संघर्ष अजून थांबला नव्हता. चालत जात असताना कोणीतरी डाव्या बाजूच्या जबड्याला धडक दिली आणि जबडा दुखावला. त्यानंतर दाढदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर शहरातील विविध खासगी रुग्णालयांत उपचार सुरू केले. त्याची जखम कर्करोगसदृश असल्याने कर्करोगाच्या तपासण्या सुरू झाल्या. आता त्याची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. सध्या दवाखान्यात नेणे-आणणे, औषधोपचार, राहण्याची सोय मित्र जितेंद्र डफळे करत आहेत. आरोग्य योजनेतून शस्त्रक्रिया होणार असली तरी औषधोपचार, सर्जरी आणि उदरनिर्वाहाचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे.

 

मित्रांची धडपड
सतत हसतमुख चेहरा, समोरून जाणाऱ्या प्रत्येकाला अगरबत्ती घ्या, अशी विनंती करणारा धनंजय सध्या आयुष्याची लढाई लढतो आहे. अगदी कमी वयात संकटांचा सामना करावा लागत असला तरी त्याने स्वावलंबत्व जपले आहे. त्याची शस्त्रक्रिया लवकरात लवकर व्हावी, यासाठी त्याचे मित्र प्रयत्नशील आहेत.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special youth dhananjay parkale story Dilbahar Talim kolhapur