कोल्हापुरात होणार गोलमेज परिषद ; खासदार, आमदारांचे प्रतिकात्मक पुतळे जाणार 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

मराठा आरक्षणाला सर्वोच्य न्यायालयात स्थगिती मिळाल्याने मराठा तरूणांत असंतोष पसरला आहे.

कोल्हापूर : मराठा आरक्षणासंबंधी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी 23 सप्टेंबरला (बुधवारी) कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषद होणार आहे. अशी माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. रावजी मंगल कार्यालय (सानेगुरूजी वसाहत) येथे दुपारी साडेबारा वाजता परिषदेस सुरवात होईल. राज्यभरातील पन्नास मराठा संघटनांचे प्रतिनिधी परिषदेत सहभागी होतील असेही पाटील यांनी सांगितले. विजय महाडिक, भरत पाटील, दिग्विजय मोहिते, भास्कर जाधव आदि उपस्थित होते. 

सुरेश पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाला सर्वोच्य न्यायालयात स्थगिती मिळाल्याने मराठा तरूणांत असंतोष पसरला आहे. ज्या मागणीसाठी गेल्या 23 वर्षापासून आम्ही  संघर्ष केला त्यालाच स्थगिती मिळाल्याने आमच्या पदरी निराशा पडली. मराठा समाजातील मुला मुलींचे शिक्षणाचे तसेच नोकरीचे दरवाजे बंद झाले आहेत. पुढे काय करायचे असा प्रश्‍न आहे? आंदोलनाशिवाय पर्याय राहिलेला नाही. आंदोलनाची नेमकी दिशा ठरविण्यासाठी गोलमेज परिषद होत आहे. त्यात मराठा संघटना, वकील. जेष्ठ इतिहास संशोधकांचे मते ध्यानात घेऊन दिशा निश्‍चित होईल. राज्य शासनाला अल्टीमेटम दिला जाईल. नंतर आंदोलनाशिवाय पर्याय असणार नाही. 

हेही वाचा- आण्णा तुम्ही जा... मायला, बारक्‍याला सांभाळा

आरक्षणावरील स्थगिती उठेल  तोपर्यंत राज्य शासनाने मुली मुलींचे शैक्षणिक शुल्क भरावे, "सारथी' साठी पाचशे कोटींची तरतूद करावी, आरक्षणाच्या आंदोलनात ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या कुटुंबियांना दहा लाखांचे अनुदान देण्यासंबंधी कालावधी निश्‍चित करावा, जिल्ह्यात मराठा वसतिगृह उभारावे, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे  काम लवकर सुरू करावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळासाठी एक हजार कोटींची तरतूद करावी, शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, या मागण्या शासनाने तातडीने मार्गी लावाव्यात असेही पाटील यांनी नमूद केले. यावेळी प्रा. चंद्रकांत भराट,जयदीप शेलखे, शिवाजी लोंढे, दादासाहेब देसाई, सचिन साठे आदि उपस्थित होते. 

हेही वाचा- आता पार्सल सेवा रात्री नऊपर्यंतच ; मात्र या हॉटेलांना परवानगी नाहीच
 

खासदार, आमदारांचे प्रतिकात्मक पुतळे जाणार 
संसदेचे अधिवेशन सुरू आहे. मराठा खासदारांनी आरक्षणा संबंधी नेमके काय करता येईल यासंबंधीचे पत्र तातडीने द्यावीत. राज्यातील मराठा आमदारांनीही ठोस भुमिका जाहीर करावी. तसे न झाल्यास त्यांच्या मतदारसंघात प्रतिकात्मक पुतळे जाणार असल्याचे समितीचे समन्वय विजय महाडिक यांनी सांगितले. घराणेशाहीच्या राजकारणामुळे गरीब मराठ्यांचे नुकसान होत आहे. श्रीमंत पण मराठा असलेल्या आमदारांचे राजकारण खपवून घेणार नाही. प्रसंगी गनिमी काव्याने आंदोलन करू. त्याचे काय परिणाम व्हायचे आहेत ते होऊ दे असा इशारा महाडिक यांनी दिला. 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state-wide round table conference will be held in Kolhapur on September 23 (Wednesd