बेळगाव - मणगुत्तीत सात दिवसांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना होणार  

The statue of Shivaji Maharaj will be erected again in belgaum mangutti
The statue of Shivaji Maharaj will be erected again in belgaum mangutti

हुक्केरी : मणगुत्ती (ता. हुक्केरी) येथील बसस्थानकाजवळ ५ ऑगस्ट रोजी प्रतिष्ठापना केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा ७ ऑगस्ट रोजी रात्री उतरविण्यात आला आहे. त्यानंतर गावात तणावपूर्ण वातावरण बनले. तसेच कर्नाटक-महाराष्ट्रात ही माहिती पोहोचल्याने आसपासच्या विविध जिल्ह्यातील शेकडो शिवभक्त आज (ता. ९) येथे एकवटले. ग्रामस्थांसह महिलादेखील एकत्र आल्याने हजारो शिवप्रेमी चौकात तणावपूर्ण वातावरण बनले होते. 

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्याबाबत ठोस निर्णय झाल्याशिवाय मागे न हटण्याचा निर्धार नागरिकांनी केला. विविध घोषणांनी चौक दणाणून गेला होता. अखेर दुपारी तहसीलदार, पोलिस अधिकारी, मणगुत्ती, बेनकनहोळी व बोळशनट्टी या तिन्ही गावातील पंच मंडळींची बैठक झाली. त्यात सात दिवसात कायदेशीर बाबींची पूर्तता करून सन्मानपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे कर्नाटक-महाराष्ट्रातील शिवप्रेमींमधून जल्लोष करण्यात येत आहे. 

मणगुत्ती बसस्थानकानजीक शिवाची महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यास काही संघटनांकडून विरोध झाल्याने गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. त्यानंतर रितसर परवानगीनंतर पुन्हा पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्याच्या आमदार सतीश जारकिहोळी यांच्या आश्वासनानंतर पुतळा उतरवून ग्राम पंचायतीमध्ये सुरक्षितपणे ठेवण्यात आला. मात्र येथील वातावरण तणावपूर्णच राहिले. येथे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी यमकनमर्डी पोलिस ठाण्यामार्फत उपनिरीक्षक रमेश पाटील यांच्याकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 


रविवारी (ता. ९) सकाळपासूनच येथे गर्दी होण्यास प्रारंभ झाला. त्यात महिलांची संख्या जास्त होती. बघता बघता बसस्थानक चौक गर्दीने फुलून गेला. महिलांनी शिवाजी महाराजांचा पुतळा प्रतिष्ठापना करण्यासाठी उभारलेल्या चबुतराजवळच ठिय्या मारला. यावेळी कर्नाटक-महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शिवप्रेमी दाखल झाले. त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यामुळे संपूर्ण गाव दणाणून गेले. 

हुक्केरीचे मंडल पोलिस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी यांनी ठिय्या मारलेल्या महिलांची व नागरिकांची भेट घेतली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे तसेच रितसर परवानगीनंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना होणार असल्याचे सांगितले. मात्र जमाव वाढतच राहिला. शिवपुतळ्याच्या प्रतिष्ठापनेबाबतचा निर्णय होईपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार सर्वांनी केला. त्यामुळे येथील वातावरण पूर्णतः शिवमय झाले होते.
 दुपारी जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी, अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख अमरनाथ रेड्डी, तहसीलदार अशोक गुराणी दाखल झाले. 

अमरनाथ रेड्डी, अशोक गुराणी, श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष
 रमाकांत कोंडुसकर यांनी मणगुत्ती, बेनकनहोळी व बोळशनट्टी या तिन्ही गावातील प्रमुख पंच मंडळींची बैठक घेतली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रतिष्ठापनेबाबत सर्वांचे एकमत असल्याचे सांगण्यात आले. तसेच सात दिवसात कायदेशीर बाबींची पूर्तता करून सन्मानपूर्वक पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. याची माहिती चौकात जमलेल्या शिवप्रेमी व ग्रामस्थांना देण्यात आली. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन अधिकारी व पंच मंडळींनी केले. त्यामुळे सर्व मंडळींमधून आनंद व्यक्त करण्यात आला. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अधिकारी आणि तिन्ही गावातील प्रमुख व पंच मंडळींची बैठक लवकरच होणार असल्याचे सांगण्यात आले. सात दिवसात शिपुतळ्याची प्रतिष्ठापना न झाल्यास पुन्हा चबुतऱ्यावर पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्याचा इशारा शिवप्रेमींकडून देण्यात आला.


घोषणांनी मणगुत्ती दणाणली

मणगुत्ती येथे विविध जिल्ह्यातील अनेक गावातून शिवसैनिक आले होते. त्यांनी 'जय भवानी, जय शिवाजी', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'छत्रपती संभाजी महाराज की जय', 'राजमाता जिजाऊ की जय' यासह विविध घोषणा दिल्या. त्यामुळे संपूर्ण गाव दणाणून गेले होते.

 विविध जिल्ह्यातील शिवभक्त

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उतरविण्यात आल्याची बाब गंभीर आहे. त्यामुळे बेळगाव, कोल्हापूर, विजापूर, सांगली, बागलकोट यासह कर्नाटक-महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शिवप्रेमी व शिवभक्त मणगुत्ती येथे आज एकत्र आले होते. त्यासह विविध जिल्ह्यातून स्थानिक पातळीवर शिवपुतळा उतरविल्याच्या घटनेचा निषेध करण्यात आला. त्यामुळे आसपासच्या जिल्ह्यातील वातावरण शिवमय बनले होते. शिवपुतळा प्रतिष्ठापना झालीच पाहिजे, अशी सर्वांची मागणी त्यातून दिसून आली.

संपादन - धनाजी सुर्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com