आता चालण्यावरही मिळणार तुम्हाला मोठे बक्षिस

औंकार धर्माधिकारी
Thursday, 3 September 2020

चाला ‘नीट’, मिळवा आकर्षक ‘गिफ्ट’ 

शिवजित घाटगे यांनी बनवले ॲप  

कोल्हापूर : लोकांना चालण्याची सवय लागावी आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी ‘स्टेप सेट गो’ हे ॲप बनवले आहे. आपण रोज किती पावले चालतो, याची नोंद हे ॲप ठेवते. एक हजार पावले चालल्यावर त्याचे गुण मिळतात. विशिष्ट गुण मिळाले, की त्या व्यक्तीला आकर्षक भेटवस्तू मिळते. आतापर्यंत जगभरातल्या ६४ लाख लोकांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. मूळचे कोल्हापूरचे असणारे शिवजित घाटगे यांनी हे ॲप बनवले आहे. सध्या ते मुंबईत स्थायिक आहेत. शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंहराजे घाटगे यांचे ते चुलत भाऊ आहेत. 

 या ॲपच्या माध्यमातून अनेक गोष्टी सुलभ पद्धतीने करू शकतो. आरोग्य, व्यायाम, डाएट यासह अन्य बाबींना केंद्रस्थानी ठेवून वेलनेस हे नवे सेक्‍टर समोर आले आहे. स्टेप सेट गो हे यातीलच एक ॲप आहे. शिवजित घाटगे, निफाल सुराखिया, अभय पाय यांनी मिळून १० जानेवारी २०१९ रोजी हे ॲप बनवले आहे. हे ॲप प्ले स्टोअर व ॲप स्टोअर येथे उपलब्ध आहे.

ॲप डाउनलोड केल्यावर त्यावर आपण रोज किती पावले चालतो याची नोंद ठेवली जाते. एक हजार पावले झाल्यावर सक्‍सेस गो कॉईन मिळतो. अशा प्रकारे काही ठराविक कॉईन खात्यात जमा झाले, की आकर्षक भेटवस्तू मिळते. यात दुचाकी, आयफोन, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू मिळतात. आतापर्यंत तीन व्यक्तींना दुचाकी तर २० व्यक्तींना आयफोन भेट मिळाले आहेत. आजपर्यंत जगभरातील ६४ लाख लोकांनी हे ॲप डाउनलोड केले आहे. 

हेही वाचा- ...अन्‌ खाकी वर्दीही गहिवरली ; त्या मुलीसाठी ठरले देवदूत

चालणे हा सर्वांत सोपा आणि प्रभावी व्यायाम आहे; मात्र अनेक कारणांनी लोक चालण्याचा आळस करतात. लोकांना चालण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांनी चालावे, त्यांचे आरोग्य चांगले राहावे हा ॲप निर्मितीचा उद्देश आहे. 
- शिवजित घाटगे, स्टेप सेट गो ॲपचे निर्माते.

हेही वाचा-सकारात्मक बदल : यंदा कोल्हापूरात ध्वनिप्रदूषणात झाली लक्षणीय घट

 

पंतप्रधानांकडून गौरव 
आत्मनिर्भर भारत, ॲप इनोव्हेशन चॅलेंजमध्ये हेल्थ विभागात स्टेप सेट गो ॲपला प्रथम क्रमांक मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात या ॲपचा उल्लेख करून त्याच्या यशाबद्दल निर्मात्यांचे कौतुक केले आहे. 

 

  संपादन -  अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Step Set Go App developed by Shivjeet Ghatge He is the cousin of Samarjeet Singh Raje Ghatge