संघर्ष तिच्या पाचवीला पुजलेलाच; पण स्वेटरच्या दुनियेतून घेतली फिनिक्‍स भरारी 

आकाश खांडके
Thursday, 17 September 2020

चार भिंतींत राहून काय करता येईल, हा शोध सुरू असतानाच त्यांना लोकरकामाच्या कार्यशाळेबद्दल माहिती मिळाली.

टेंबलाईवाडी (कोल्हापूर) : जन्मजात अपंगत्व व्यक्तीला आयुष्यभरासाठी निराश करते पण, त्यातूनही मार्ग काढत स्वत:च्या पायावर उभा राहणाऱ्या व्यक्ती प्रेरणास्थान ठरतात. 
अयोध्या पार्कमध्ये राहणाऱ्या मिनाक्षी आप्पासाहेब पाटील यांनी पायाच्या व्याधीला यशाच्या मार्गावरील अडथळा होऊ दिला नाही. रिसेप्शनिस्ट ते यशस्वी उद्योजिका हा त्यांचा प्रवास उल्लेखनीय आहे. रोजगार निर्मिती करुन 12 कुटुंबांना त्यांनी आधार दिला आहे. 

मिनाक्षी पाटील यांना menigoyelocil आजार आहे. त्यांच्या पायांना संवेदना जाणवत नाहीत. पाय लुळे पडतात. या आजराबरोबर त्यांना अनेक अडचणी येतात. शिक्षणाची आवड असल्यामुळे त्यांनी पदवी मिळवली. शिक्षण सुरू असतानाच त्यांनी दवाखान्यात रिसेप्शनिस्टची नोकरी स्वीकारली. त्यांनी तीन वर्षे नोकरी केली. सगळे सुरळीत सुरू असताना नियतीने अजून एक घात घातला. दवाखान्याबाहेर त्या पाय घसरून पडल्या आणि चालण्याचा प्रयत्नही थांबला. पदवी शिक्षण झालेले, नोकरीची इच्छा होती. पण, व्हीलचेअरने धरलेली पाठ सुटणे शक्‍य नव्हते. 

चार भिंतींत राहून काय करता येईल, हा शोध सुरू असतानाच त्यांना लोकरकामाच्या कार्यशाळेबद्दल माहिती मिळाली. त्या व त्यांच्या काकी त्यात सहभागी झाल्या. सरावासाठी केलेले स्वेटर विक्री झाले. त्यांनी आई-वडिलांना मशीन घेण्यासाठी तयार केले. मशीन घेतल्यावर काकींच्या मदतीने किरकोळ काम सुरू झाले. घरकाम करणाऱ्या सुमनने त्यांना साथ दिली. कार्यशाळेनंतर या व्यवसायात उतरलेल्या बहुतांश व्यक्तींनी काढता पाय घेतला. पण त्यांनी संयमाने काम सुरू ठेवले. शेजारच्या कुटुंबाकडून 45 शालची ऑर्डर मिळाली. त्यानंतर होलसेल ऑर्डर मिळायला सुरुवात झाली. 

स्वयंसिद्धाच्या अध्यक्षा कांचन परुळेकर यांनी काम बघून प्रदर्शनात सहभाग घेण्यास प्रोत्साहित केले. एकदम 400 स्वेटरची ऑर्डर मिळाली. व्याप वाढला म्हणून अजून एक मशीन घेतले व एका महिलेला कामावर रुजू केले. एक दोन स्वेटरपासून सुरू केलेले काम पाचशे, हजारच्या घरात पोचले. सध्या पंधरा महिला कामावर रुजू आहेत. 

हे पण वाचा ... अन् ती डॉक्टर झालीच ; कहाणी एका जिद्दीची!

 

आई-वडिलांनी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माझी साथ दिली. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला म्हणून मी आज इथेपर्यंत पोचले आहे. सुमन जाधव हिचा सुद्धा माझ्या यशात वाटा आहे. 
- मिनाक्षी अप्पासाहेब पाटील

गणेशमूर्ती संग्रहाचा छंद 
मिनाक्षी यांना विविध प्रकारच्या गणेश मूर्ती संग्रह करण्याचा छंद आहे. 100 हून अधिक मूर्ती त्यांनी संग्रहित केल्या आहेत. याच बरोबर त्यांना वाचनाचीही आवड आहे. 

हे पण वाचा - तरूणाने नदीतील दगडी दीपमाळेवरून  पाण्यात उडी मारताच पोलीसांच्या उरात भरली धडकी

 

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: success story to Sweater Professional