शिक्षकांनी पुढील आदेशापर्यंत स्वॅब देऊ नका ; जिल्हाधिकारी दौलत देसाई 

सुनील पाटील 
Friday, 20 November 2020

शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना स्वॅब चाचणी करणे बंधनकारक केले आहे.

कोल्हापूर : 9 वी ते 12 वीच्या शाळा, महाविद्यालय सुरू होत आहेत. यासाठी माध्यमिक शिक्षक व शिक्षकतेतर कर्मचाऱ्यांचे कोरोना तपासणीसाठी नमुने घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. मागील 4 दिवसात सुमारे 5000 च्यावर नमुने संकलित केले आहेत. त्यामुळे घेतलेल्या कोरोना चाचणीचा निष्कर्ष येण्यास विलंब होईल. यासाठी पुढील आदेश होई पर्यंत शिक्षक व कर्मचाऱ्यांनी स्वॅब देण्यासाठी जाऊ नये. तसेच मुख्याध्यापकांनीही कोणत्याही शिक्षकास व कर्मचाऱ्यास स्वॅब (swab) घेण्यासाठी पाठवू नये. फक्त कोरोना लक्षणे असल्यास किंवा कोरोना लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील लोकांचे स्वब घेतले जातील, अशा सूचना कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिल्या आहेत. 

शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना स्वॅब चाचणी करणे बंधनकारक केले आहे. जिल्ह्यात तालुक्‍याच्या ठिकाणी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी स्वॅब देण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत. सध्या पाच हजारांहून अधिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना तपासणी करण्यासाठी आपले स्वॅब दिले आहेत. दररोज यामुळे मोठी गर्दी होत असताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी हा निर्णय घेतला आहे. काही दिवसाने पुन्हा देता येण्याची शक्‍यता आहे. 

आतापर्यंत आलेल्या चाचण्यांची तपासणी व्हायची आहे. याला वेळ लागू शकतो. तोपर्यंत ज्यांना लक्षणे आहेत किंवा ज्या व्यक्ति कोरोना बाधित लोकांच्या संपर्कात आल्या आहेत. अशाच लोकांची तपासणी केली जाईल. दरम्यान, शाळा सुरु करण्याबाबत उद्या शिक्षण अधिकारी, शिक्षक संस्थांची बैठक घेतली जाणार आहे. 
-दौलत देसाई, जिल्हाधिकारी  

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers do not swab until further notice Collector Daulat Desai