पक्ष पाठिंब्यासाठी सरसावले शिक्षक

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

गत निवडणुकीमध्ये दत्ता सावंत विजयी झाले. अपक्ष सावंत यांना सत्ताधारी महाविकासआघाडी पाठिंबा देईल, अशी चर्चा आहे.

कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जानेवारीत होण्याची शक्‍यता आहे. निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून, शिक्षकांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. संस्था आणि राजकीय पक्ष यांच्या पाठिंब्यासाठी आता शिक्षक सरसावले आहेत.

गत निवडणुकीमध्ये दत्ता सावंत विजयी झाले. अपक्ष सावंत यांना सत्ताधारी महाविकासआघाडी पाठिंबा देईल, अशी चर्चा आहे. साताऱ्यातून रयत शिक्षण संस्थेतील डॉ. मोहन राजमाने हे गेल्या वेळच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी देऊन रयत शिक्षण संस्था पाठिंबा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

गेल्या वेळी बारामतीतून तावरे यांनी बंडखोरी केली होती. यंदाही ते निवडणूक लढवणार का? याचीही उत्सुकता आहे. सोलापूरमधून जितेंद्र पवार हे निवडणूक लढण्यास इच्छुक असून भाजप शिक्षक आघाडीचा त्यांना पाठिंबा मिळेल,अशी चर्चा आहे. मात्र अद्याप भारतीय जनता पक्षाने कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. 

साताऱ्यातून हिंदवी संस्थेचे अमित कुलकर्णी ही रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. सध्या ते शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य असून विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारीही आहेत. ते भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. पक्ष त्यांना पाठिंबा देतो का? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

कोल्हापूरमधून ‘सुटा’चे सुभाष जाधव यांनी आपली उमेदवारी घोषित केली आहे. पुरोगामी प्राध्यापक व शिक्षक संघटना यांचा त्यांना पाठिंबा आहे. प्राचार्य डॉ.राजेंद्र कुंभार यांनीही आपली अपक्ष उमेदवारी घोषित केली आहे. याशिवाय शिक्षक भारतीय संघटनेचे पुणे विभाग अध्यक्ष दादा लाड. संस्थाचालक संघाचे सचिव जयंत असेगावकर हे देखील निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. 

हे पण वाचारस्त्यावर निर्जन ठिकाणी तरूणीचा विनयभंग ; पीडितेची आत्महत्या

महाविकास आघाडीचा पाठिंबा दोघांपैकी कोणाला मिळतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. विनाअनुदानित कृती समितीचे बाबासाहेब पाटील, नितीन पाटील, रेखा दिनकर पाटील यांचीही नावे चर्चेत आहेत. निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला तरी पडद्यामागच्या हालचालींना वेग आला आहे. १ नोव्हेंबर २०१६ ते १ नोव्हेंबर २०२० या कालावधीत तीन वर्षे अध्यापनाचे काम करणारे शिक्षक मतदान करू शकतात. 

हे पण वाचातुम्ही कधी पिलाय का? ७५ हजार रुपये किलोचा ‘व्हाईट’ चहा

 

शिक्षक मतदार नोंदणी
(आकडे निश्‍चित नाहीत)
कोल्हापूर     १२,०००
पुणे      २०,०००
सातारा      ७,५००
सांगली      ७,५००
सोलापूर     ११,५००
एकूण      ६०,५००

संपादन - धनाजी सुर्वे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers rushed for party support