धक्कादायक : त्या तिघी राहतात स्वच्छता गृहात अन्...

मिलिंद देसाई 
Tuesday, 16 June 2020

मध्यवर्ती बस स्थानक परीसरातील दुचाकी पार्कींग परीसरात राहणाऱ्या तीन महिलांनी आपल्या जीवनात अनेक संकटे झेलली आहेत.

बेळगाव : घरदार नसल्यामुळे अनेकांना फुटपाथवर आसरा घ्यावा लागतो. त्यामुळे फुटपाथवर राहणाऱ्या लोकांच्या त्रासाबाबत नेहमीच चर्चा होते. मात्र अठरा विश्‍व दरीद्र असल्यामुळे तिन महिलांना गेल्या अनेक महिन्यांपासून चक्‍क स्वच्छता गृहात राहून दिवस काढावे लागत आहे. कधी कधी तर त्यांना उपाशी राहून जीवन कंठावे लागत असून रोटी, कपडा आणी मकानसाठी सुरु असलेली त्यांची परवड ह्रृदय हेलावणारी आहे. 

मध्यवर्ती बस स्थानक परीसरातील दुचाकी पार्कींग परीसरात राहणाऱ्या तीन महिलांनी आपल्या जीवनात अनेक संकटे झेलली आहेत. जोपर्यंत अंगात बळ होते तोपर्यंत या महिलांनी शहरात विविध ठिकाणी काम केली. त्याचा मोबादलाही त्यांना बऱ्यापैकी मिळत होता. परंतु जसे जसे वय वाढत गेले तसे काम जमत नसल्याने त्यांनी महिलांच्या स्वच्छता गृहासमोर बसून शुल्क वसूल करण्याचे काम करण्यास सुरुवात केली. मात्र राहण्यासाठी घर नसल्याने सकाळपासून संध्याकाळपर्यंत शौचालया समोर बसायचे तर रात्री शौचालयात झोपायचे असा त्यांचा दिनक्रम सुरु आहे. 

येथे राहणाऱ्या अक्‍काताई कामत या आपले मुळ गाव गडहिंग्लज तालुक्‍यातील कडगाव असल्याचे सांगतात. लग्नानंतर दोन मुली झाल्या आणि त्यानंतर पतीचे निधन झाले. त्यामुळे माहेरी न जाता त्या बेळगावला आल्या. तेंव्हापासून शहर आणि परीसरात विविध कामे केली. मात्र त्यांनतर काम मिळेनासे झाल्याने गेल्या तीन वर्षांपासून शौचालयात राहत आहेत. दरम्यानच्या काळात एका मुलीचा मृत्यू झाला आणि एक मुलगी उडपीला राहते. मात्र आपला सांभाळ करत नाही असे त्यांचे म्हणने आहे.

मध्यवर्ती बस स्थानकात नेहमीच वर्दळ असते. मात्र लॉकडाऊनमुळे बस स्थानक परीसरात पुर्णपणे शुकशुकाट होता. तसेच तिकडे कोणीही न फिरकल्याने येथे राहणाऱ्या तीन महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अनेकदा उपाशी राहून जगावे लागले होते. उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळ्यात शौचालय परीसरात वावरणाऱ्या या महिला दोन-तीन दिवसांपासून इतर ठिकाणी निघून गेल्या आहेत. मात्र पर्याय नसल्याने पुन्हा त्यांना या ठिकाणीच यावे लागणार आहे. 

ना आधार कार्ड ना रेशन कार्ड अशा परिस्थितीत जगणाऱ्या या महिलांना अंगावरील कपड्‌यांसाठीही दुसऱ्यांवर अवलंबून रहावे लागत असून आयुष्यभर कष्ट करुन वाढविलेल्या मुलांनीही पाठ फिरवल्याने शेवटचे दिवसही स्वच्छता गृहातच काढण्याची वेळ येणार असल्याने शौचालय परीसरात येणाऱ्या लोंकाकडून काही तरी मदत मिळेल या आशेने त्या पहात असतात. मात्र पदरी निराशाच पडत असल्याने सध्या तरी त्यांचे जगने असह्य झाले आहे.

हे पण वाचा - शरद पवार यांनी शब्द पाळला!... माजी खासदार राजू शेट्टी होणार आमदार

 

हे पण वाचा -  व्हिडीओ : अध्यक्ष म्हणाले 'तुझ्या पप्पाला 'या' निर्णयाबाबत विचार...'
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three women of them live in a toilet at belguam