वसुबारसने आजपासून दीपोत्सवाला प्रारंभ; खरेदीसाठी गर्दी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 November 2020

विविध सामाजिक उपक्रमांवरही भर
 

कोल्हापूर : वसुबारसने आज (गुरुवार)पासून दीपोत्सवाला प्रारंभ होणार असून, यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आवश्‍यक ती सर्व खबरदारी घेत हा उत्सव साजरा होणार आहे. 
शनिवार (ता. १४) आणि सोमवार (ता. १६) हे दोन दिवाळीचे मुख्य दिवस असून, खरेदीसाठी कोल्हापूरकरांनी सहकुटुंब गर्दी केली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मास्क न वापरणाऱ्यांबरोबरच सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या दुकानांवर दंडात्मक कारवाईला महापालिकेने प्रारंभ केला आहे. येत्या दोन दिवसांत ही कारवाई आणखी व्यापक केली जाणार आहे. दरम्यान, उत्सवकाळात विविध सामाजिक उपक्रमांवरही भर दिला जाणार आहे. 

एक हजार कुटुंबांना आरोग्यदायी भेट सुपूर्द
येथील निसर्गमित्र संस्थेच्या परिवारातील भारत चौगुले, यश चौगुले, शिवतेज पाटील, रोहित गायकवाड, शोएब शेख, रणजित माळी आदी तरुणांनी फटाक्‍यांवरील खर्च टाळून ती रक्कम संकलित केली. त्यातून एक हजार कुटुंबांना आरोग्यदायी भेट सुपूर्द करण्यात आली. महालक्ष्मीनगर, मंगेशकरनगर, मंडलिक वसाहत, सरनाईक वसाहत, बेलबाग, रविवार पेठ या परिसरातील कुटुंबांचा त्यात समावेश होता. सुगंधी उटण्याचे पाकिट, फुफ्फुस व हृदयाच्या फिजिओथेरपी व्यायामासाठी फुगा आदी साहित्याची ही आरोग्यदायी भेट असून संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले, विलास डोर्ले, सुनील चौगुले, राणिता चौगुले, अनुराधा चौगुले, कस्तुरी जाधव आदींनी संयोजन केले. 

कुष्ठधामसंगे दिवाळीशेंडा पार्क येथील चेतना विकास मंदिर या शाळेत आज ‘कुष्ठधामसंगे दिवाळी’ हा उपक्रम साजरा झाला. कुष्ठरुग्ण बांधव व भगिनींना यावेळी नवीन कपडे व भेटवस्तू देण्यात आल्या. त्यासाठी मुंबईचे उपेंद्र गायतोंडे यांचे विशेष सहकार्य मिळाले. 

हेही वाचा- पुणे पदवीधर मतदार संघातून अरुण लाड यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर -

फटाक्‍याच्या पैशातून गरजू विद्यार्थ्यांना मदत
शिवाजी पेठेतील शिवाजी मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांतर्फे यंदाही फटाक्‍यांचे पैसे वाचवून गरजू मित्रांना नवीन कपडे व दिवाळी भेट दिली जाणार आहे. शाळा अजूनही सुरू नाही; मात्र सुधाकर जोशीनगरातील बहुतांश विद्यार्थी या शाळेत आहेत. या विद्यार्थ्यांनी गेल्या चार दिवसांपासून निधी संकलन केले असून उद्या (गुरुवारी) गरजू मित्रांना ही मंडळी नवीन कपडे व भेटवस्तू सुपूर्द करणार आहेत.

दृष्टिक्षेपात दीपोत्सव....
 गुरुवार (ता. १२) ः वसुबारस   शुक्रवार (ता. १३) ः धन्वंतरी पूजन   शनिवार (ता. १४) ः नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजन
 सोमवार (ता. १६) ः दीपावली पाडवा व भाऊबीज.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vasubaras starts Deepotsava festival from today