
गडहिंग्लज शहरात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आणि गर्दीच्या ठिकाणावर असलेल्या फेरीवाल्यांसह भाजी विक्रेत्यांचे स्थलांतर करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
गडहिंग्लज : शहरात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आणि गर्दीच्या ठिकाणावर असलेल्या फेरीवाल्यांसह भाजी विक्रेत्यांचे स्थलांतर करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. उद्यापासून (ता. 3) त्याची अंमलबजवाणी होणार असून मुलींच्या हायस्कूलजवळ असलेल्या पालिकेच्या खुल्या जागेत त्यांची व्यवस्था केली आहे.
शहरातील मुख्य रस्ता, लक्ष्मी मंदिर रोड, राणी लक्ष्मीबाई रोड, कडगाव रोड कॉर्नर, दसरा चौक परिसरात फेरीवाल्यांची संख्या मोठी झाली आहे. याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात येणाऱ्या हातगाड्यांमुळे मुख्य रस्ता आणखीन अरुंद होत आहे. परिणामी वाहतुक कोंडीत भर पडत आहे.
छोटे-मोठे अपघात होत आहेत. भडगाव रोडवर पालिकेने सुसज्ज भाजी मंडई उभारली असतानाही अनेक किरकोळ विक्रेते भाजी विकण्यासाठी लक्ष्मी रोडसह वीरशैव चौक आणि मोक्याच्या ठिकाणी बसत आहेत. यामुळे शहरातील गर्दीमध्ये भर पडत आहे. अनेक संघटनांनी निवेदन देवून याकडे लक्षही वेधले आहे.
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढायला सुरुवात झाली आहे. त्यातच लक्ष्मी रोड आणि मुख्य रस्ता परिसर गर्दीने फुलून जात आहे. कोरोनामुळे गर्दी कमी करण्यासाठी वारंवार जनजागृती होत असताना शहरात मात्र गर्दीच गर्दी पहायला मिळत आहे. यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व सुरळीत वाहतुकीसाठी प्रशासनाने फेरीवाल्यांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजी विक्रेत्यांनाही त्यांच्यासोबत हलविण्यात येणार आहे. गेल्या तीन-चार दिवसापासून स्वतंत्र वाहनाद्वारे ध्वनीक्षेपकावरुन याची माहिती दिली जात आहे. सातत्याने सूचना देवूनही यापूर्वीही विक्रेते जागा सोडण्यास तयार नव्हते. आता पालिका प्रशासन कडक भुमिकेत असून कोणत्याही परिस्थितीत अशा विक्रेत्यांचे स्थलांतर करण्यावर ठाम आहे. यामुळे उद्यापासून (ता. 3) त्याची अंमलबजावणी होणार असल्याचे सांगितले. उद्यापासून पूर्वीच्या जागेवरच हातगाडी किंवा भाजी विक्री करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
उद्यापासूनच अंमलबजावणी
फिरते विक्रेते आणि भाजी विक्रेत्यांमुळे शहरात गर्दी वाढत आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर होतच आहे, शिवाय गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका आहे. याचा विचार करुन त्यांना तात्पुरत्या स्वरुपात मुलींच्या हायस्कूलजवळील खुल्या जागेत स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासूनच त्याची अंमलबजावणी होईल.
- नागेंद्र मुतकेकर, मुख्याधिकारी
संपादन - सचिन चराटी
kolhapur