वॉटर एटीएम चौकशीसाठी गावभेटी पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

जिल्हा परिषदेतील वॉटर एटीएम, घनकचरा प्रकल्प व 14 व्या वित्त आयोगाच्या आराखड्याबाहेरील खर्चाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने गावभेटी पूर्ण केल्या आहेत.

कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील वॉटर एटीएम, घनकचरा प्रकल्प व 14 व्या वित्त आयोगाच्या आराखड्याबाहेरील खर्चाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने गावभेटी पूर्ण केल्या आहेत. मागील दोन दिवसांपासून समितीने शासकीय विश्रामगृहात थांबून सर्व माहिती संकलित करुन अधिकाऱ्यांचे जबाब घेऊन अहवाल लेखणास सुरुवात केली आहे, मात्र सध्या चौकशी अधिकारी तथा ग्रामविकास विभागाचे उपसचिव उदय जाधव हे सर्किट हाउस येथे थांबले असून, उर्वरित अधिकारी आपापल्या कामाच्या ठिकाणी रुजू झाले आहेत. 

ग्रामविकास विभागाचे उपसचिव उदय जाधव यांची समिती या चौकशीसाठी नेमण्यात आली, तर त्यांना साहाय्य करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी भरत शेंडगे, लेखाधिकारी झपाटे व मंत्रालयीन अधिकारी सराफ यांची नियुक्‍ती केली. ही समिती कोल्हापुरात गुरुवारी दाखल झाली. 

दिवसभर त्यांनी तक्रारी स्वीकारल्या. तर शुक्रवार, शनिवारी त्यांनी गावभेटी करून प्रत्यक्षात पाहणी केली. यानंतर रविवारी या अधिकाऱ्यांनी आलेल्या तक्रारी व त्याअनुषंगाने आलेल्या माहितीची छाननी केली. तसेच अधिकाऱ्यांचे जबाब घेतले. सोमवारी कमिटीचे प्रमुख जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Village visits completed for water ATM inquiries