हातकणंगले तालुक्यातील 'या' देवालयातील जल, माती जाणार अयोध्येला

अतुल मंडपे
Monday, 27 July 2020

प्रभू रामचंद्र चौदा वर्षे वनवासात असताना हा परिसर त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. येथील शिवलिंगाची त्यांनी स्थापना केली असून पूजेसाठी त्यांनी मारलेल्या धनुष्यबाणातून शिवपिंडीवर सतत जलाभिषेक होत असतो, असे सांगितले जाते.

हातकणंगले : प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आळते (ता. हातकणंगले) येथील डोंगरातील रामलिंग मंदिराच्या परिसरातील जल आणि माती अयोध्या येथे राम मंदिराच्या पायाभरणीसाठी पाठवण्यात येणार आहे.

प्रभू रामचंद्र यांचे वनवास काळामध्ये येथे काही काळ वास्तव्य होते. त्याकाळी त्यांनी डोंगरात धनुष्यबाण मारून पाण्याचा जिवंत झरा काढला होता. तेव्हापासून अद्याप अविरतपणे झऱ्यातून पाण्याचा उमाळा सुरू असल्याची आख्यायिका सांगितली जाते. याच झऱ्याचे पाणी आणि येथील माती सोमवारी सकाळी अकरा वाजता रामलिंग येथील शिवपिंडीला अभिषेक घालून अयोध्येकडे रवाना करण्यात येणार आहे. 

प्रभू रामचंद्र चौदा वर्षे वनवासात असताना हा परिसर त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. येथील शिवलिंगाची त्यांनी स्थापना केली असून पूजेसाठी त्यांनी मारलेल्या धनुष्यबाणातून शिवपिंडीवर सतत जलाभिषेक होत असतो, असे सांगितले जाते. 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते अयोध्येत राम मंदिराची पायाभरणी होत आहे. यासाठी देशभरातून ऐतिहासिक भूमीवरील जल व माती संकलित केली जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील रामलिंग या ऐतिहासिक भूमीतून सोमवारी जल आणि माती पाठवण्यात येत आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते अरुण इंगवले यांनी पुढाकार घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत हे जल व माती अयोध्येला पाठवण्यात येणार आहे. 

 

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water And Soil From Ramling Temple Will Go To Ayodhya Kolhapur Marathi News