नवा ट्रेंड: कलाकुसरीचा मॉडर्न लूक!

संदीप खांडेकर
Tuesday, 1 December 2020

टिंबर मार्केटमध्‍ये सीएनसी रावटरवर नक्षीकामाचा नवा ट्रेंडटिंबर मार्केटमध्‍ये सीएनसी रावटरवर नक्षीकामाचा नवा ट्रेंड

संभाजीनगर (कोल्हापूर) : दरवाजाला नक्षीकाम करायचे असेल तर दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागत नाही. लाकडी फर्निचरवर कलाकुसर तर बघता बघता आकार घेते. नक्षीकाम कोणतेही असो, ती बिनचूकच होते. ही कमाल कलाकारांची नाही, तर टिंबर मार्केटला मिळालेल्या ‘कम्प्युटर टच’ची आहे. अत्याधुनिक सीएनसी रावटरवर नक्षीकाम करण्याचा नवा ट्रेंड भलताच फेमस झाला आहे. शहरात किमान आठ ते दहा रावटर मशिन दाखल झाली असून, एका दिवसात दरवाजावर नक्षीकाम झळकत आहे.

 

 दरवाजा, खिडक्‍या, पलंगवर नक्षीकामाची कलाकुसर नवी नाही. सुतार व्यावसायिकांत ती पिढ्यानपिढ्या हस्तांतरित झाली. दरवाजावर नक्षीकामाची हौस आजही ग्रामीण भागात पाहायला मिळते. जुन्या वाड्यांच्या दरवाजांवर ती विशेषत्वाने दिसते. नक्षीकाम सुतार व्यावसायिकांच्या आवडीचे असले तरी ते तितकेच डोकेदुखीचे. त्यातील अचूकता साधताना अक्षरश: घाम फुटतो. मात्र, तंत्रज्ञानाच्या क्रांतीने नक्षीकामाचे आव्हान स्वीकारले आहे. कम्प्युटरवर नक्षीकामाचा प्रोग्रॅम फीड करून तो रावटरवर लावलेल्या लाकडावर कोरला जातो. हवी ती कलाकुसर या मशिनद्वारे लाकडावर आकार घेते. किमान पंधरा दिवसांचे काम एका दिवसांवर येऊन ठेपले आहे. 

हेही वाचा- कुरुंदवाड पालिकेत आघाडीत बिघाडी -

आठ वर्षांपासून रावटरवर नक्षीकाम करण्यास सुरवात झाली असली तरी टिंबर मार्केटमध्ये त्याला पाच वर्षे झाली. आठ ते दहा मशिन इथल्या व्यावसायिकांच्या कारखान्यात बसविली आहेत. त्यातून त्यांच्या वेळेचे गणित पक्के बसले असून, ग्राहकाला हवी ती कलाकुसर करून दिली जात आहे. विशेष म्हणजे ज्या नक्षीकामासाठी आठ ते दहा हजार रुपये मोजले जात होते, त्यासाठी आता अडीच ते तीन हजार रुपये द्यावे लागत आहेत. प्लायवूडवर नक्षीकाम अशक्‍य, असा समज रूढ झाला होता. रावटरने त्यावरही मात केल्याचे अमोल सुतार सांगतात.

 

रावटरमुळे नक्षीकामाची गती वाढली आहे. देव-देवता, प्राण्यांपासून कोणतेही नक्षीकाम लाकडावर कोरणे शक्‍य झाले आहे. ग्राहकांकडून दरवाजा, पलंगाला नक्षीकामाचा हट्ट आवर्जुन धरला जात आहे. व्यवसायातील हा बदल दोन-तीन वर्षांत जाणवत आहे. 
- नितीन सुतार, व्यावसायिक, टिंबर मार्केट

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: windows carvings on the bed kolhapur culture