World Cancer Day : ...त्यामुळेच होतो कर्करोग

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 February 2020

बदलती जीवनशैली, वाढती व्यसनाधीनता यामुळे कर्करोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे, चुकीची उपचार पद्धतही त्यास कारणीभूत असल्याचे कर्करोग रोगतज्ज्ञ डॉ. सूरज पवार यांनी "सकाळ' ला सांगितले. जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने ते बोलत होते. 

कोल्हापूर  : बदलती जीवनशैली, वाढती व्यसनाधीनता यामुळे कर्करोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे, चुकीची उपचार पद्धतही त्यास कारणीभूत असल्याचे कर्करोग रोगतज्ज्ञ डॉ. सूरज पवार यांनी "सकाळ' ला सांगितले. जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने ते बोलत होते. 

हे पण वाचा - ब्रेकिंग ; करवीर निवासिनी आंबाबाई मंदिरात चोरी; चोरट्याला रंगेहात पकडले

डॉ. पवार म्हणाले, ""पूर्वी साठ ते सत्तराव्या वर्षी होणारा कर्करोग हल्ली 30 ते 40 वर्षांच्या पिढीमध्ये दिसत आहे. प्रामुख्याने तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. यामागे स्थूलपणा, जीवनशैली, व्यायामाचा अभाव, तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, ई-सिगारेट, तसेच दारूचे व्यसन कारणीभूत आहे. गुटखा आणि मावा सेवनामुळे तरुण वर्गाच्या तक्रारीत वाढ झाली आहे. पूर्वी कर्करोग अर्थात कॅन्सर हा दुर्मिळ रोग समजला जायचा. आता तो सार्वत्रिक होत आहे, ही बाब चिंता वाढविणारी आहे. पूर्वी वर्षाला साडेसात लाख ते पंधरा लाखांपर्यंत कर्करोगाच्या रुग्णांची संख्या दिसून यायची. आता हेच प्रमाण 12 ते 15 लाखांच्या घरात गेले आहे. 

हे पण वाचा -  सावधान : फॅशन म्हणून किल्ला भटकंतीस येताय......

कर्करोग नुसतीच शारीरिक हानी करत नाही, तर संबंधित रुग्ण आणि नातेवाइकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. समाज आणि संसार उद्‌ध्वस्त करणारा हा रोग आहे. त्याच्यापासून जेवढे अलिप्त राहता येईल, तेवढे राहण्याचा प्रयत्न करावा. प्राथमिक अवस्थेत त्याचे निदान झाल्यानंतर तो बरा होण्यास मदत होते. तीस ते चाळीसपर्यंतच्या वयातील कर्करोग अधिक आक्रमक असतो. तो बरा होणे फार कठीण असते. 
स्त्रियांत स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असून, यामागे बदलती जीवनशैली तसेच स्थूलपणा कारणीभूत असल्याचे पवार यांनी नमूद केले.'' 

प्रबोधन आणि जनजागृती महत्त्वाची 
डॉ. पवार म्हणाले, ""पश्‍चिम महाराष्ट्रात तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. एकदा कर्करोगाचे निदान झाले तर त्यावर कोणत्या पद्धतीने उपचार करायचे याच्या शास्त्रीय कसोट्या निश्‍चित झाल्या आहेत, असे उपचारच योग्य असतात, मात्र बरेचजण अशास्त्रीय उपचारांना बळी पडतात आणि शेवटच्या टप्प्यात आमच्याकडे येतात. कर्करोगाचे समूळ उच्चाटन व्हायचे असेल तर सामाजिक प्रबोधन आणि जनजागृती महत्त्वाची आहे. कर्करोगमुक्त जीवनशैली हेच ध्येय असायला हवे.'' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Cancer Day Causes of Cancer