आमदार भारत भालके यांचे  कोल्हापूरच्या शाहूपुरी तालमीत कुस्तीचे धडे 

 Wrestling lessons of MLA Bharat Bhalke at Shahupuri Training Center, Kolhapur
Wrestling lessons of MLA Bharat Bhalke at Shahupuri Training Center, Kolhapur

कोल्हापूर : तगडी शरीरयष्टी, काळी दाढी, अंगावर पांढरा शुभ्र सदरा, विजार, डोक्‍यावर टोपी अन्‌ जोडीला भारदस्त आवाज, हे जबरदस्त व्यक्तिमत्त्व पंढरपूर-मंगळवेढाचे आमदार भारत भालके यांचे, काल ते पडद्याआड गेले. कोल्हापूरच्या शाहूपुरी तालमीत तयार झालेले भालके पंढरपुरात आमदार झाले; पण कोल्हापूरच्या तांबड्या मातीशी त्यांची नाळ कायम होती. अचानक ते गेल्याने कुस्तीशौकिनांतून हळहळ व्यक्त होत आहे. 

पंढरपूर तालुक्‍यातील चंद्रभागा नदीकाठचं सरकोली हे भालके यांचे गाव. गावातल्या आखाड्यातच भालकेंनी कुस्तीचा श्रीगणेशा केला. 
वडील तुकाराम यांना कुस्तीचा छंद. पोरगा पैलवान व्हावा, ही त्यांची इच्छा. वडिलांच्या इच्छेखातर भारत यांना 1975 ला कोल्हापूरच्या शाहूपुरी तालमीत कुस्तीच्या सरावासाठी पाठवले. तेथून सुरू झाला त्यांचा कुस्तीचा प्रवास. वस्ताद महंम्मद हनिफ यांच्या मार्गदर्शनाखाली ते कुस्तीचे धडे गिरवू लागले. 

शाहूपुरी तालमीत भारत भालकेंचा जोर-बैठकांचा पारा वाढत होता. शरीर कसदार बनत होतं. कुस्तीचं तंत्र लवकरच त्यांनी आत्मसात केले. कोल्हापूरनजीकच्या कुस्ती स्पर्धा, तसेच खासबागच्या फडात उतरत त्यांनी कुस्त्या मारल्या. भालके यांची गावाकडील आर्थिक परिस्थिती चांगली होती. स्वभाव कडक असला तरी ते सर्वांच्या मिसळत. अनेक मल्लांना ते मदत करत. महाराष्ट्र केसरी इस्माईल शेख, 
उपमहाराष्ट्र केसरी शंकर तोडकर, सिद्धेश्वर साखरे या तगड्या मल्लांच्या सोबतीने ते घडत होते. 

1980 ला नागपूर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 85 किलो वजनी गटात त्यांनी चमकदार कामगिरी केली. पोकळ घिस्सा, डंकी या डावांवर कुस्ती मारण्यात त्यांचा हातखंडा होता. कुस्तीचा आखाडा गाजवून गावी परतल्यानंतर ते राजकारणाच्या आखाड्यात उतरले. 
साखर कारखान्याचा संचालक ते सलग तीन वेळा आमदार होत त्यांनी हॅट्ट्रिक साधली. विधानसभेत त्यांचा रांगडा आवाज गेली 12 वर्षे घुमत होता. राजकारणात असले तरी त्यांचे कुस्तीप्रेम कायम होते. कुस्तीच्या स्पर्धा भरवत त्यांनी अनेक मल्लांना प्रोत्साहित केले. त्यांच्या जाण्याने एक रांगडा नेता पडद्याआड गेला आहे. 


शरद पवारांच्या भाषणाने झाले प्रभावित 
भालके यांना कुस्तीबरोबर राजकारणाचेही आकर्षण होते. एकदा शाहूपुरी तालमीत सरावाला असताना बिंदू चौकात शरद पवार यांचे भाषण असल्याचे भालके यांना समजल्यावर ते भाषण ऐकायला गेले. पवारांच्या भाषणाने ते प्रभावित झाले. गावाकडे परतत थेट लक्ष्मण ढोबळे यांच्या निवडणूक प्रचारात ते सहभागी झाले. शरद पवार यांच्यावर त्यांची निष्ठा कायम होती. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासारख्या बड्या नेत्याला पराभूत करून ते पहिल्यांदा आमदार झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com