करमाळा तालुक्‍यात सुरू आहे रब्बी हंगामातील ज्वारी काढणीची लगबग

राजाराम माने 
Monday, 15 February 2021

वरचेवर बळिराजाकडून नगदी पिकांना प्राधान्य दिले जात असल्याने रब्बी हंगाम गहू, हरभरा, कांदा या पिकांपुरताच मर्यादित राहिला आहे. उजनी लाभक्षेत्रात उसाचे मुख्य पीक असले तरी काही शेतकरी रब्बी हंगामातील ज्वारी हे पीक घरच्यापुरते का होईना म्हणून शिल्लक राहिलेल्या शेतात घेत आहेत. 

केत्तूर (सोलापूर) : वरचेवर बळिराजाकडून नगदी पिकांना प्राधान्य दिले जात असल्याने रब्बी हंगाम गहू, हरभरा, कांदा या पिकांपुरताच मर्यादित राहिला आहे. उजनी लाभक्षेत्रात उसाचे मुख्य पीक असले तरी काही शेतकरी रब्बी हंगामातील ज्वारी हे पीक घरच्यापुरते का होईना म्हणून शिल्लक राहिलेल्या शेतात घेत आहेत. या ज्वारी पिकाच्या काढणीची लगबग पोमलवाडी, खातगाव, देलवडी, हिंगणी, कुंभारगाव, सावडी, राजुरी, पोंधवडी, उमरड, पोफळज, वाशिंबे आदी परिसरात सुरू झाली आहे. 

ज्वारीची काढणी ही कणसासह उपटून केली जाते. कापणी केल्यानंतर कडब्याचा उपयोग होत नाही. ज्वारीबरोबरच जनावरांच्या चाऱ्यासाठी कडब्याचा वापर केला जातो. ज्वारी काढून नंतर पेंढ्या बांधून कणसे वेगळी काढून ती यंत्रात टाकून ज्वारी केली जाते. कारण, काळाच्या ओघात शेतातील खळी केव्हाच गायब झाली. 

परिसरात यावर्षी सतत झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारीच्या पेरण्या लांबल्या होत्या. त्यातच वारंवार बदलणाऱ्या हवामानाचा फटका ज्वारीलाही बसला असून ज्वारीची कणसे दाणेदार झाली नसल्याने व परिसरात उसाचे क्षेत्र असल्याने पक्ष्यांनीही या जवळच्या कणंसावर डल्ला मारल्याने ज्वारीचे उत्पन्न निश्‍चितच घटणार आहे. 

करमाळा तालुक्‍यातील जिरायत भागातील ज्वारीही काढणीस तयार झाली आहे. बहुतांश शेतकरी हे भाजीपाला पिकाकडे (कांदा, मेथी, लसूण, कोथिंबीर ) वळले आहेत. त्यामुळे ज्वारीचे क्षेत्रही कमी प्रमाणात दिसून येत आहे. पशुपालकही ज्वारीचा कडबा गुरांसाठी चारा म्हणून खरेदी करून गंजी लावण्याला पसंती देत आहेत. 

उजनी पाणलोट क्षेत्रातून तरी ज्वारीचे पीक सध्या हद्दपार होऊ लागले आहे. त्यामुळे हुरड्याची चवही चाखायला मिळत नाही. वरचेवर ज्वारीचे पीक कमी होत असल्याने गरिबाची भाकरी महाग होणार असून ती श्रीमंताच्या ताटात जाणार आहे, हे मात्र निश्‍चित. 

शेतीमध्ये नवनवे प्रयोग केले जात असल्याने ज्वारीचे क्षेत्र मात्र कमी होत आहे. वरचेवर रब्बी हंगामातील तीळ, करडई व सूर्यफूल यांसारख्या तेल उत्पादक पिकांकडेही शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. एकूणच, वरचेवर कृषिप्रधान भारत देशात आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात पारंपरिक पिके मात्र वरचेवर इतिहासजमा होतात की काय, याचा विचार करण्याची वेळ मात्र आली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Karmala taluka farmers are rushing to harvest rabi sorghum crop