#Solapur : जागा बळकावणाऱ्या टोळ्यांना पोलिसांचा दणका!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

जागेवर कब्जा करून जर कोणी तुम्हाला दमदाटी करत असेल, पैशांची मागणी करत असेल तर पोलिसात तक्रार करावी.
- हेमंत शेडगे, 
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विजापूर नाका पोलिस ठाणे

सोलापूर : जागा बळकावण्याच्या उद्देशाने दमदाटी करून अतिक्रमण करणाऱ्या, खंडणी मागणाऱ्या दोन टोळ्यांना शहर पोलिसांनी झटका दिला आहे. दोन प्रकरणांत नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

#SaveMeritSaveNation : 'रन फॉर मेरिट'मध्ये धावले शेकडो सोलापूरकर!

फलक लावून जागा बळकावण्याचा डाव 
मजरेवाडी परिसरातील भीमनगर येथील खुल्या जागेवर बेकायदेशीरपणे फलक लावून जागा बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या सचिन विठ्ठल जाधव, सचिन सिद्राम जाधव आणि एका अनोळखी व्यक्तीवर विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रजनी प्रदीप भुर्के यांनी फिर्याद दिली आहे. रजनी भुर्के यांचे पती प्रदीप भुर्के हे आधी सोलापुरात नोकरीला होते. त्या वेळी त्यांनी मजरेवाडी भागातील भीमनगर येथे इरव्वा रखमाजी जोगदनकर यांच्याकडून 1994 ला जागा खरेदी केली होती. त्यानंतर भुर्के यांची कोल्हापूरला बदली झाली. त्यांचे कुटुंबीयही कोल्हापूरला स्थलांतरित झाले. मजरेवाडी येथील जागेवर बांधकाम केले नव्हते. अधूनमधून ते सोलापुरात आल्यानंतर जागेवर येऊन पाहणी करीत होते. एका मित्राने 5 जानेवारी 2020 रोजी त्यांना फोन केला. तुमच्या जागेवर सचिन विठ्ठल जाधव, सचिन सिद्राम जाधव या दोघांच्या मालकीच्या नावाचा फलक लावला आहे. जागेवर अतिक्रमण केल्यास कारवाई केली जाईल, असे नमूद केल्याचे कळविले. भुर्के यांनी आरोपींना संपर्क केला. गायकवाड यांच्याकडून जागा विकत घेतल्याचे आरोपींनी सांगितले. तलाठी कार्यालयात तसेच महापालिकेत जाऊन चौकशी केल्यानंतर ती जागा त्यांच्याच नावावर असल्याचे दिसून आले. आरोपींनी अतिक्रमण करून जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे तपास करीत आहेत. 

स्मार्ट सोलापुरात अवैध धंदे करणाऱ्यांना "मोक्का'चा झटका

खंडणी मागणाऱ्या सहा जणांवर गुन्हा 
तुझ्या बापाला मी जागा सोडणार नाही... तुझा बाप सध्या हायकोर्टात गेला आहे... त्याच्या वरच्या कोर्टात गेला तरी मी घाबरत नाही... तुला जर जागा पाहिजे असेल तर तीन कोटी रुपये मला दे अशी धमकी देऊन खंडणी मागितल्याप्रकरणात सदर बझार पोलिसांत सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. नागनाथ दत्तू गायकवाड, नागनाथ मनोहर गायकवाड, विनोद नागनाथ गायकवाड, गणेश मारुती जाधव, सलमान म. शफी खान, अमोल प्रेमसिंग बायस अशी आरोपींची नावे आहेत. 5 ऑगस्ट 2019 रोजी हॉटेल खानचाचा परिसरात ही घटना घडली आहे. हर्षल राजगोपाल झंवर (वय 31, रा. पश्‍चिम मंगळवार पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. घाबरून झंवर यांनी काकांशिवाय या घटनेबाबत कोणालाही सांगितले नव्हते. याबाबत त्यांनी पोलिस आयुक्तांकडे अर्ज दिला होता. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 11 सप्टेंबर 2019 रोजी आरोपींनी झंवर यांच्या कार्यालयात येऊन मारहाण केली होती. आमच्या नादी लागलास तर तुला जीवानिशी जावे लागेल, उचलून गाडीत टाकून घेऊन जाऊ, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्यात नागनाथ मनोहर गायकवाड यास अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन बंडगर तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action on fraudsters at solapur