त्यांची मैत्री असेल किंवा आणखी काय तुम्हाला काय? (Video)

अशोक मुरुमकर/ सुस्मिता वडतीले
Tuesday, 4 February 2020

मुलीला मारहाण करणे हा महाराष्ट्राला शोभणारा प्रकार नसून दोघांच्या संमतीने भेटले असतील तर त्यात गैर काय, असा सवाल तरुणाईने केला आहे. यावर संताप व्यक्त करतानाच "अशा लोकवस्ती नसलेल्या ठिकाणी मुलींनी जाणे टाळावे,' असे आवाहन काहींनी केले आहे.

सोलापूर : जालना येथे एका प्रेमीयुगलास अमानुष मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर व्यक्त होताना सोशल मीडियावर तरुणाईने संताप व्यक्त केला आहे. काय जबरदस्ती आहे... कशाला उगीच त्रास देत आहेत हे लोक, ही तर सरळ गुंडागर्दी आहे... त्या दोघांची मैत्री असेल किंवा आणखी काही... ते एकमेकांच्या संमतीने तिथे बसले होते, तर हे काय उगीच... अशा प्रतिक्रिया देऊन या घटनेचा सोलापुरातील तरुणाईने निषेध केला आहे. 

हेही वाचा- जयंती स्वरभास्करांची...! .....आणि पंडितजी म्हणाले उतरा खाली...

जालना जिल्ह्यातील गोंदेगाव शिवारात तीन ते चार तरुणांनी एका महाविद्यालयीन प्रेमीयुगुलास जबर मारहाण केली. मारहाण करताना त्यांचा व्हिडिओ करून सोशल मीडियावर टाकल्याचा प्रकार घडला. 31 जानेवारीला हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. या चौकशीतून काय येईल ते येईल पण, ज्या पद्धतीने त्यातील तरुणीला मारहाण झाली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यावर संताप व्यक्त होत आहे. मुलीला मारहाण करणे हा महाराष्ट्राला शोभणारा प्रकार नसून दोघांच्या संमतीने भेटले असतील तर त्यात गैर काय, असा सवाल तरुणाईने केला आहे. यावर संताप व्यक्त करतानाच "अशा लोकवस्ती नसलेल्या ठिकाणी मुलींनी जाणे टाळावे,' असे आवाहन काहींनी केले आहे. "मुलगी अशा ठिकाणी गेली असेल तरी बाकीच्या लोकांना अशी दंडेलशाही करण्याचा अधिकार नाही. तिने स्वत:हून मदत मागितली तर मदत करणे हे लोकांचे कामच आहे. इथे सगळे उलटे सुरू असल्याचे' मत काहींनी मांडले आहे. "ज्या ठिकाणी मुलीवर विनाकारण अन्याय होतो, त्या ठिकाणी युवकांनी मध्यस्थी केली तर कौतुकास्पद आहे. मात्र मुलींचा सन्मान न राखता तिच्यासोबत अशा तऱ्हेने वागणे चुकीचे आहे. मुली व मुले संमतीने भेटत असतील तर इतरांनी आपल्याला हे सुख भेटत नाही म्हणून त्रास देणे गैर आहे. अशा लोकांना धडा शिकवलाच पाहिजे,' असे मत तरुणांनी "सकाळ'कडे व्यक्त केले आहे. 

 हेही वाचा- राजस्थानहून बॅग आली, पण अमेरिकेतून मागवलेले बूट गायब!
कोण काय म्हणाले... 
अक्षय क्षीरसागर ः जालन्यात घडलेली घटना ही सर्वांसमोर आली आहे. सोशल मीडियावर होत असलेल्या व्हायरल व्हिडिओ या घटनेचा मी निषेध करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताने संविधान लिहून सर्वांना स्वातंत्र्य दिलेले आहे. वयाच्या 18 व्या वर्षांपासून प्रेम, लग्न करून देताताच. सर्वांना समसमान अधिकार आहे. त्यामुळे कोणीही असे प्रकार कोणासोबत करू नये. 
शिवानी ढवणे म्हणाले ः प्रेम करणे कोणताही गुन्हा नाही. एकमेकांना दोघे आवडत असेल आणि एकमेकांच्या आवडीने भेटत असतील तर प्रेम अजिबातच वाईट नाही. आपला समाज प्रेमाच्या विरुद्ध आहे आणि त्याचा त्रास जास्त मुलींनाच होतो. प्रेम करतानाचा अनेक अडचणी येतात. अनेक स्तरावर नेहमीच प्रेमाची भाषा केली जाते. 
पवन सुतार ः आपण छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले यांच्या महाराष्ट्रात राहतो. असा प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल करणे आणि त्यांची बदनामी करने याचा मी निषेध करतो. 
चंदाराणी हवळे ः प्रेमीयुगुलांच्या घरच्यांची एकमेकांसोबत सहमती असेल तर काही अडचण नाही. परंतु असे व्हिडिओ व्हायरल करणे ही गोष्ट चुकीची आहे. या गोष्टीचा मी निषेध करते. असे कृत्य करणे चुकीचे आहे. 
शुभम जाधव ः आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो. त्यात अनेक काही गोष्टींचा फायदा घेत असतो. परंतु असे काही प्रकार घडतात त्याचा आपण फायदा घेऊ नये. त्या-त्या प्रसंगी गोष्टींचा आदर आणि भान ठेवले पाहिजे. कोणत्याही गोष्टींचा फायदा घेणे हा गुन्हा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anger in a youth in Solapur over the Jalana incident