खुषखबर ! बार्शीच्या शाह रक्तपेढीला जिल्ह्यात प्रथम प्लाझ्मा थेरेपीची मान्यता

Shah Blood Bank
Shah Blood Bank

बार्शी (सोलापूर) : शहरातील श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था, नवी दिल्ली यांच्याकडून प्लाझ्मा थेरेपीसाठी सोलापूर जिल्ह्यात प्रथमच मान्यता मिळाली आहे, अशी माहिती रक्तपेढीचे उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांनी दिली. 

जागतिक महामारी कोव्हिड-19 रुग्णांना उपचारासाठी उपयुक्त ठरत असलेल्या प्लाझ्मा थेरपीचा उपयोग कोरानाबाधित रुग्णांवर यशस्वीरीत्या केला जाऊ शकतो. त्यामुळे रुग्णाला नवजीवन मिळण्याची शक्‍यताही आहे. मुंबई-पुणेसारख्या महानगरांत सध्या प्लाझ्मा दान करून कोरोना रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढविण्यात येत असतानाच, बार्शीसारख्या निमशहरी भागातही इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीला प्लाझ्मा थेरपीची अधिकृत मान्यता मिळाली, ही बाब बार्शीकरांसाठी व जिल्ह्यातील रुग्णांसाठी मोठी दिलासा देणारी बाब आहे. 

सध्या बार्शी शहर व सोलापूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या असाध्य रोगावर अद्याप तरी प्रभावी लस किंवा औषध निघाले नाही. जगभर लस व प्रभावी औषधासाठी संशोधन सुरू आहे. प्रभावी व उपयुक्त ठरेल असे सद्य:स्थितीत कोणतेही औषध उपलब्ध नाही. पॉझिटिव्ह रुग्ण हॉस्पिटलमधून योग्य उपचार घेऊन पूर्णतः बरा झाल्यानंतर 28 दिवसांनंतर त्याच्या अँटी बॉडीजची (प्रतिकारशक्ती) चाचणी घेतली जाते. अँटी बॉडीज आढळल्यानंतर त्याच्या इतर सर्व चाचण्या करून त्याचा प्लाझ्मा काढला जातो. जो रुग्ण उपचार घेत आहे त्याला तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्लाझ्मा देण्यात येतो. यामुळे पॉझिटिव्ह रुग्णाची रोग प्रतिकारशक्ती वाढते. ही सुविधा रक्तपेढीला मिळवून देण्यासाठी बार्शीचे सुपुत्र व राज्याचे अन्न व औषधे प्रशासनाचे आयुक्त अरुण उन्हाळे (मुंबई), पुण्याचे सहआयुक्त एस. बी. पाटील व सोलापूरचे सहाय्यक आयुक्त भालेराव यांनी सहकार्य केले. ही सुविधा रक्तपेढीत सुरू करण्यासाठी अध्यक्ष डॉ. विक्रांत निमकर, डॉ. रामचंद्र जगताप व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

याबाबत अजित कुंकूलोळ म्हणाले, बार्शी शहर व तालुक्‍यातील कोव्हिड-19 या आजारातून उपचार घेऊन घरी परतलेल्या नागरिकांना आवाहन करण्यात येते, की अशा नागरिकांनी स्वखुशीने प्लाझ्मा दान करण्यासाठी रक्तपेढीत यावे; जेणेकरून आपल्या प्लाझ्मा दानमुळे बाधितांना रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत होईल. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com