esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

धक्कादायक... रेल्वेत जागेच्या वादातून झालेल्या मारहाणीत तरूणाचा मृत्यू

आई-पत्नीच्या डोळ्यादेखत अंत 
आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेला मृत सागर मारकड हा कल्याण येथे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. पत्नीच्या कडेवर लहान मुलगी असल्याने तिला बसण्यासाठी जागेची विनंती केली होती. डोळ्यादेखत सागरचा करुण अंत पाहिलेली त्याची आई मंदा जनार्दन मारकड व पत्नी ज्योती मारकड दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या आवारात सुन्नपणे बसून होते. तर दोन वर्षांच्या निरागस मुलीकडे पाहून नातेवाईक अस्वस्थ झाले होते.

धक्कादायक... रेल्वेत जागेच्या वादातून झालेल्या मारहाणीत तरूणाचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पुणे ते घोरपडी रेल्वे प्रवासात मुंबई-लातूर एक्‍स्प्रेसमध्ये प्रवाशांनी केलेल्या बेदम मारहाणीत एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. सागर जनार्दन मारकड (वय 26, रा. माढा, जि. सोलापूर) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. 
दौंड लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाने या प्रकरणी ताईबाई मारुती पवार (वय 30), कलावती धोंडिबा चव्हाण (वय 65), रूपाली सोमनाथ चव्हाण (वय 21), गणेश शिवाजी चव्हाण (वय 24, सर्व रा. मांडेगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) निकिता अशोक काळे (वय 20), अशोक अप्पा काळे (वय 35), जमुना दत्ता काळे (वय 20, तिघे रा. भूम, जि. उस्मानाबाद), ताई हनुमंत पवार (वय 35), हनुमंत गणपत पवार (वय 30, दोघे रा. कळमवाडी, जि. सोलापूर), गंगूबाई नामदेव काळे (वय 40, रा. शेलगाव, जि. सोलापूर), सोनू अप्पा काळे (वय 24, रा. शिंगोळी, जि. उस्मानाबाद ) व एक अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर सोमनाथ शिवाजी चव्हाण (वय 19, रा. मांडेगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) हा पळून गेला आहे. 

हेही वाचा - मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला निधी कधी? 

निघाले होते अंत्यविधीला 
पुणे लोहमार्ग पोलिस दलाचे उपअधीक्षक नरेंद्रकुमार गायकवाड व दौंड लोहमार्गाच्या पोलिस निरीक्षक दीपाली भुजबळ यांनी सांगितले की, सागर मारकड हे आपली आई, पत्नी व लहान मुलीसमवेत एका अंत्यविधीसाठी पुणे रेल्वे स्थानकावरून मुंबई-लातूर-बिदर एक्‍स्प्रेसने कुर्डुवाडी येथे निघाले होते. मध्यरात्री पावणेएक वाजता पुणे रेल्वे स्थानक सोडताच सर्वसाधारण डब्यात गर्दी असल्याने सागरने दरवाजालगतच्या बाकड्यावरील महिलेस पत्नीला बसण्यासाठी जागा देण्याची विनंती केली. परंतु महिलेने जागा न देताच सागर यास शिवीगाळ केली. "शिवीगाळ करू नका', असे सांगताच महिलेसमवेत असलेल्या अन्य महिला व पुरुषांनी सागर यास काठीसह हात व पायांनी बेदम मारहाण केली. पोलिसांनी सागर यास दौंड येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो पुणे लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत घडल्याने त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. 

हेही वाचा - पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे या महापालिकेची वाढली थकबाकी 

तीन वेळा साखळी ओढली, पण... 
सागरच्या पत्नीने तीन वेळा आपत्कालीन साखळी ओढली; परंतु गाडी थांबून पुन्हा सुरू झाली. मारहाणीमुळे सागर बेशुद्ध होऊन पडला होता व त्या दरम्यान एका प्रवाशाने पोलिस नियंत्रण कक्षाला हा प्रकार कळविला. दौंड लोहमार्ग पोलिसांनी माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दीपाली भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे सव्वादोन वाजता एक्‍स्प्रेस दाखल होताच हवालदार कैलास शितोळे व राजू जाधव, रेल्वे सुरक्षा दलाचे दोन जवान यांनी नागरिकांच्या साह्याने मारहाण करणाऱ्यांना ताब्यात घेतले. 

go to top