esakal | आता पंढरपुरात भाजपमध्येही बंडखोरीची शक्‍यता?
sakal

बोलून बातमी शोधा

Nagesh Bhosale

विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीबरोबरच भाजपमध्येही बंडखोरी होण्याची शक्‍यता आहे. भाजप आमदार प्रशांत परिचारकांचे कट्टर समर्थक माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले हे उद्या (ता. 30) आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भोसलेंच्या भूमिकेमुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

आता पंढरपुरात भाजपमध्येही बंडखोरीची शक्‍यता?

sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीबरोबरच भाजपमध्येही बंडखोरी होण्याची शक्‍यता आहे. भाजप आमदार प्रशांत परिचारकांचे कट्टर समर्थक माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले हे उद्या (ता. 30) आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भोसलेंच्या भूमिकेमुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

पंढरपूरची पोटनिवडणूक महाविकास आघाडी व भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. राष्ट्रवादीने दिवगंत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केली तर भाजपने संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताडे यांना मैदानात उतरवले आहे. आमदार प्रशांत परिचारकांनी अवताडेंची धुरा आपल्या हातात घेतली आहे. त्यामुळे भाजपसाठी ही जमेची बाजू आहे. 

तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचार सुद्धा सुरू केला आहे. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शैला गोडसे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करून मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. शिवसेना आणि स्वाभिमानीच्या उमेदवारांमुळे महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्‍यता आहे. त्यातच भाजपमध्येही बंडखोरीची लागण होण्याची शक्‍यता आहे. 

भाजपकडून इच्छुक असलेले नागेश भोसले यांनीही ही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. उद्या ते स्वतः अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. श्री. भोसले हे भाजप आमदार प्रशांत परिचारक यांचे कट्टर समर्थक आहेत. शिवाय परिचारकांच्या पंढरपूर शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती आहेत. त्यांचा पंढरपूर शहर व मतदार संघात दांडगा जनसंपर्क आहे. त्यांची उमेदवारी कायम राहिली तर भाजप उमेदवारासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे आमदार परिचारक भोसलेंची कशी समजूत काढतात, हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल