ब्रेकिंग...अजितदादांनी उद्या बोलविली बोरामणी विमानतळासाठी बैठक 

प्रमोद बोडके
Monday, 14 September 2020

पाच वर्षे गेली वादात... 
सोलापुरातील विमानसेवा सुरु करावी अशी सर्वांचीच मागणी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने होटगी रोडवरील विमानतळाला प्राधान्य दिले. 2019 मध्ये राज्यात सत्तांतर झाल्याने सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीने होटगी रोडवरील विमानतळाचा विषय बाजूला केला आहे. बोरामणी येथे आंतराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी राज्य सरकारने युध्द पातळीवर प्रयत्न करु लागले आहे. 

सोलापूर : कोरोनाच्या संकटात काही महिने आडबाजूला गेलेल्या बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विषय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा अजेंड्यावर घेतला आहे. या विमानतळाचा प्रश्‍न तत्काळ मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले आहे. या विमानतळासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूदही केली आहे. या विमानतळासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्या (मंगळवार, ता. 15) दुपारी 12 वाजता मंत्रालयातील त्यांच्या दालनात महत्वाची बैठक बोलविली आहे. 

बोरामणी येथील विमानतळाला निधीची तरतुद केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना करत भुसंपादनासह इतर प्रश्‍न तातडीने निकाली काढण्याच्या सूचना केल्या आहेत. बोरामणी येथील विमानतळ लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी उद्या होणाऱ्या महत्वाच्या बैठकीसाठी आमदार प्रणिती शिंदे, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाचे व अन्य सर्व संबंधित अधिकारी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे व्हीसीद्वारे या बैठकीत सहभागी होणार आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात या विमानतळाला निधी मिळाल्यानंतर कोरोनाच्या संकटात विमानतळाच्या कामाचा मुद्दा काही काळ बाजूला पडला होता. आता बोरामणी विमानतळ संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा लक्ष घातल्याने उद्याच्या बैठकीत जिल्हा प्रशासनाला व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला उपमुख्यमंत्री अजित पवार काय सूचना देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breaking ... Ajit Pawar called a meeting for Boramani Airport tomorrow