दिवंगत आमदार भालकेंची सभागृहातील उणीव आमदार पडळकरांनी काढली भरून

The budget session was held in Pandharpur.jpg
The budget session was held in Pandharpur.jpg

पंढरपूर (सोलापूर) : मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी 35 गावांच्या पाणी प्रश्ना संबंधी गेली 11 वर्षे सातत्याने विधानसभेत आवाज उठवणारे आमदार भारत भालके यांचे अलीकडेच निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांच्या नसण्याची उणीव सभागृहासह मतदार संघातील जनतेला ही भासत आहे. त्यांच्या पश्चात रेंगाळलेला पाणी प्रश्नाविषयी सभागृहात कोण आवाज उठवणार असा प्रश्न असतानाच विधान परिषदेचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुढे येत मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी 35 गावांच्या उपसा सिंचन योजनेसाठी सरकारने तत्काळ निधी द्यावा, अशी सभागृहात मागणी करत येथील पाणी प्रश्नांनी आवाज उठवला आहे.

आमदार पडळकरांनी मंगळवेढयाच्या पाणी प्रश्नांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केल्याने दिवंगत आमदार भारत भालकेंची उणीव भरून काढल्याची भावना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केली जात आहे. विधानसभा निवडणूक आणि येथील 35 गावांचा पाणी प्रश्न हे गेल्या अनेक वर्षापासूनचे समीकरण आहे. याच प्रश्नावरती अनेक निवडणुका लढल्या गेल्या आणि त्या जिंकल्या सुध्दा परंतु येथील पाणी प्रश्न अजूनही जैसे थे आहे.

2009 मध्ये मतदार संघ पुनर्चरचेत पंढरपूर - मंगळवेढा असा नवा मतदार संघ तयार झाला. आमदार भारत भालके यांनी हाच कळीचा मुद्दा उचलून निवडणुकीचे रणशिंग फुंकले. दुष्काळी मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांना शेतीसाठी पाणी देतो, आणि दुष्काळी भाग सुजलाम सुफलाम करतो असे आश्वासन दिले होते. येथील जनतेनेही आपल्या शेतीला पाणी मिळणार म्हणून त्यावेळी भारत भालकेंना मोठी साथ दिली. केवळ पाणी प्रश्नाच्या मुद्द्यावरून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना येथे हार पत्कारावी लागली.

येथील पाणी प्रश्नासंबंधी आमदार भारत भालके यांनी राज्य सरकारकडे अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु ही योजना तांत्रिक दृष्ट्या अजून ही लालफितीत अडकून पडली आहे. 2014 साली पुन्हा विधानसभा निवडणुकीत पाणी प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामध्ये आमदार भारत भालके यांनी आमदार प्रशांत परिचारक यांचा पराभव करत बाजी मारली होती. दरम्यान राज्यात भाजप शिवसेनेची सत्ता आली. त्यामध्ये येथील पाणी प्रश्न पुन्हा पाच वर्षे रखडला. 2019 मध्ये आमदार भारत भालकेंनी काॅग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश करून निवडणुक लढवली. पुन्हा पाणी प्रश्नाची चर्चा झाली. येथील भोळयाभाबड्या लोकांनी पुन्हा आमदार भारत भालकेंना साथ दिली. यामध्ये आमदार भारत भालकेंनी भाजपचे उमेदवार माजी आमदार सुधाकर परिचारक आणि अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांचा दारूण पराभव केला.

निवडणुकीनंतर एका वर्षांमध्येच आमदार भारत भालके यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर आता विधानसभा पोट निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. निवडणुक डोळयासमोर ठेवून पुन्हा पाणी प्रश्न चर्चेचा विषय ठरणार आहे. दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवेढा येथील दुष्काळी भागातील 35 गावांसाठी मंजूर असलेल्या उपसिंचन योजनेला निधी द्यावा, अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीनंतर मतदार संघातील दुष्काळी भागात पाणी प्रश्ना विषयी चर्चा सुरू झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com