"चेंबर'ने दिले पालकमंत्र्यांना वीजबिल, पेट्रोलपंप, दुकानाच्या वेळा, मार्केट यार्डसंबंधीचे निवेदन 

श्रीनिवास दुध्याल 
Saturday, 5 September 2020

राज्य सरकारने घरगुती वीजबिलास 300 युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या ग्राहकांचे वीजबील माफ करावे. व्यावसायिक व सर्व उद्योजकांचे लॉकडाउन काळातील वीजबिल हे मीटर रीडिंगप्रमाणे आकारावे. लॉकडाउन काळातील वीज बिलाच्या स्थिर आकाराची रक्कम माफ करावी. आकारलेले पॉवर फॅक्‍टर पेनल्टी रद्द करावी, अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरतर्फे पालकमंत्र्यांकडे करण्यात आली. 

सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. 4) भेट घेऊन विकास व उद्योगवाढीच्या संदर्भात विविध मागण्या सादर केल्या आहेत. 

हेही वाचा : "सकाळ'चा पाठपुरावा : "डीपीसी'तून सुरू करा हिप्परगा तलावाचे सुशोभीकरण 

लॉकडाउन कालावधीतील वीज बिलाबद्दल राज्य शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. तसेच लॉकडाउन काळात गरीब, कष्टकरी, कनिष्ठ मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय या सर्वांची दमछाक झाली आहे. राज्य सरकारने घरगुती वीजबिलास 300 युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या ग्राहकांचे वीजबील माफ करावे. व्यावसायिक व सर्व उद्योजकांचे लॉकडाउन काळातील वीजबिल हे मीटर रीडिंगप्रमाणे आकारावे. लॉकडाउन काळातील वीज बिलाच्या स्थिर आकाराची रक्कम माफ करावी. आकारलेले पॉवर फॅक्‍टर पेनल्टी रद्द करावी. 

हेही वाचा : "तो' क्षण पाहण्यासाठी वडील हवे होते 

केंद्र सरकारच्या अध्यादेशानुसार शेतकरी त्यांचा कृषी माल देशात कोठेही विकू शकतात. व्यापारी मार्केट यार्डबाहेर कोठेही व्यापार करू शकतो व त्या व्यापारी उलाढालीवर मार्केट यार्डात कुठलाही खर्च लागणार नाही. देशात मुक्त व्यापार धोरणाअंतर्गत या व्यवसायात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य देशी व विदेशी कंपन्या उतरणार आहेत. मार्केट यार्डातील कृषी माल खरेदी-विक्री उलाढालीवर सेस, देखरेख, काटा वगैरे खर्च व मार्केट यार्डबाहेरील तशाच उलाढालीवर वरीलप्रमाणे कसलाही खर्च नाही. या विसंगतीमुळे मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर गंभीर परिणाम होण्याचा धोका निर्माण होणार आहे. तरी मार्केट यार्ड व मार्केट यार्ड बाहेरील व्यापारातील खर्चाबाबतच्या विसंगती पूर्णत: दूर करणे आवश्‍यक आहे. 

सध्या दुकानांची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 7 आहे, त्याऐवजी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत ठेवावी. सध्या पेट्रोल पंपाची वेळ अपुरी असल्याने सर्व नागरिकांची व ग्राहकांची मागणी आहे की पेट्रोल पंपाची वेळ सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत करावी. छोट्या व्यापारी, सूक्ष्म व लघू उद्योजकांकरिता खेळत्या भांडवलासाठी कमी व्याजदरात कर्जपुरवठा करणारी राज्य शासनाची योजना केंद्र सरकारच्या धर्तीवर आणावी. शहरात प्रतिबंधक औषधी फवारणीसाठी विशेष स्वतंत्र 8 अग्निशामक दलाच्या डीपीडीसीच्या माध्यमातून किंवा राज्य शासनाच्या कोव्हिड-19 योजनेतून मंजुर कराव्यात. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केलेली ही मागणी मंजूर करावी. 

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रश्नी लक्ष घालून लवकर सोडवण्याचे सकारात्मक आश्वासन दिले. या वेळी सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, मानद सचिव धवल शहा, संचालक प्रकाश वाले आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chamber of Commerce issues statement to Guardian Minister regarding electricity bill, petrol pump, shop hours, market yard