बापरे..! चित्रपटगृहचालक करताहेत "एक्‍झिट पॉलिसी'ची मागणी 

Cinema Theater
Cinema Theater

सोलापूर : टीव्हीवर दिवसभर सुरू असलेल्या मूव्ही चॅनेल्समुळे चित्रपटगृहातील प्रेक्षकांची संख्या केवळ पाच टक्‍क्‍यांवर आली आहे. आता कोरोना विषाणूच्या भीतीमुळे लॉकडाउननंतरही वर्षाखेरपर्यंत प्रेक्षक चित्रपटगृहांकडे फिरकणार नाहीत. त्यात नेटफ्लिक्‍स, ऍमेझॉनसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवीन चित्रपट प्रदर्शित होत असल्याने चित्रपटगृहे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे सरकारला विनंती आहे, की सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांसाठी "एक्‍झिट पॉलिसी' आणून त्यांना पर्यायी व्यवसायाची संधी द्यावी, अशी मागणी येथील चित्रपटगृहचालकांनी "सकाळ'शी बोलताना केली. 

बंद असूनही हजारोंचा येतोय खर्च 
शहरात जवळपास 11 चिटपटगृहे आहेत. मल्टिफ्लेक्‍स चित्रपटगृहांची त्यात भर पडली आहे. मात्र पूर्वभागातील कामगार वस्तीतील प्रेक्षकांना पद्मा, श्रीनिवास, गेंट्याल व लक्ष्मीनारायण या सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांत चित्रपट तेही नवीन असेल तर पाहायला आवडतो. मात्र मूव्ही चॅनेल्सवर दिवसभर सुरू असलेल्या चित्रपटांमुळे महिला विडी कामगार प्रेक्षकांची संख्या खूपच कमी झाली आहे. एखाद्या हिट चित्रपटावेळीच एक-दोन दिवस गर्दी दिसते, नंतर प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पाच टक्के प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहे चालवावी लागतात. आता कोरोनामुळे लॉकडाउन आहे व लॉकडाउननंतर कोरोनाची भीती कायम आहे. त्यामुळे चित्रपटगृहांसारख्या गर्दीच्या ठिकाणी प्रेक्षक येणार नाहीत. अशी परिस्थिती वर्षाखेरपर्यंत राहणार असल्याची भीती चित्रपटगृहचालकांनी व्यक्त केली. चित्रपटगृह बंद आहे तरी मालकांना दरमहा 60 ते 70 हजार रुपये खर्च करावा लागत आहे. 

काय आहेत समस्या? 

  • टीव्ही, "ओटीटी'मुळे चित्रपगृहांकडे प्रेक्षक फिरकेना 
  • प्रेक्षकांची संख्या केवळ पाच टक्‍क्‍यांवर आली 
  • आता कोरोनाच्या भीतीमुळे प्रेक्षक चित्रपटगृहांकडे फिरकणार नाही 
  • चित्रपटगृह बंद असूनही करावा लागतोय हजारोंचा खर्च 
  • चित्रपटगृहे सुरू झाल्यानंतर प्रशासनाच्या सुरक्षा नियमावलीनुसार संपूर्ण चित्रपटगृह प्रत्येक शोनंतर सॅनिटायझेशन करणे परवडणारे नाही 

पर्यायी व्यवसाय करू 
पूर्वी एक चित्रपट शंभर-दीडशे दिवस चालत होता. आता तो काळ राहिला नाही. केवळ पाच टक्के प्रेक्षकांना चित्रपट दाखवणे परवडणारे नाही. आता कोरोनामुळे प्रेक्षक चित्रपटगृहांकडे फिरकणारही नाही. चित्रपटगृहे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे सरकारने आमच्यासाठी एक्‍झिट पॉलिसी आणावी. आम्ही पर्यायी व्यवसाय करू. 
- देविदास गुंडेटी,
चालक, लक्ष्मीनारायण टॉकीज 

सिंगल स्क्रीन बंद पडण्याच्या मार्गावर 
मल्टिफ्लेक्‍स चित्रपटगृहे सुरू झाल्यापासून सिंगल स्क्रीन बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. चालू जरी ठेवले तरी परवडणारे नाही. आता लॉकडाउन शिथिलीकरणात बाजारपेठा, दुकाने सुरू होत आहेत. मात्र गर्दीचे ठिकाण म्हणून सर्वांत शेवटी चित्रपटगृहे सुरू करण्याची परवानगी मिळेल, असे वाटते. मात्र तरी प्रेक्षक येतील का, याबाबत चिंता आहे. 
- विजयकुमार गुजले,
चित्रपट डिस्ट्रिब्युटर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com