सोलापूरात पंचरंगी पोपटाचे आढळले वास्तव्य

POPAT.jpg
POPAT.jpg

सोलापूरः शहरामध्ये अनेक प्रकारच्या पक्ष्यांचे वास्तव असताना त्यामध्ये आता पंचरंगी पोपट हा पक्षी नव्याने आढळला आहे. निसर्गमित्रांनी निरीक्षणाद्वारे या पंचरंगी पोपटाचे घरटे शोधून काढत त्याची नोंद केली आहे. 

केगाव येथील पीटीएस येथे पोलिस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले तसेच नेचर कॉंझर्वेशन सर्कलचे सदस्य अकबर शेख यांना वन्यजीव रेस्क्‍यू व वन्यजीव छायाचित्रे काढण्याची देखील आवड आहे. अकबर शेख फावल्या वेळेत फोटोग्राफी करतात. आजपर्यंत त्यांनी विविध पक्ष्यांप्राण्यांचे छायाचित्रे काढलेली आहेत. 
छायाचित्रण करत असताना त्यांना पंचरंगी पोपट (प्लम हेडेड पॅराकिट) दिसून आला. अकबर यांनी त्या पंचरंगी पोपटाचे निरीक्षण केले तेव्हा त्यांना हा पक्षी एका झाडाच्या ढोलीत चोचीमध्ये पिलासाठी खाद्य घेऊन जाताना दिसून आला. 

अकबर यांनी काही दिवस निरीक्षण चालू ठेवले. त्यानंतर ही माहिती पक्षी अभ्यासक शिवानंद हिरेमठ तसेच नेचर कॉंझर्वेशन सर्कलचे प्रमुख भरत छेडा यांना दिली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सोलापुरात पहिल्यांदाच पंचरंगी पोपटाने घरटे तयार केले आहे. ही पर्यावरण दृष्टिकोनातून अतिशय चांगली व पक्षीप्रेमींसाठीही चांगली बाब आहे. तसेच सोलापूरमध्ये पक्षी वैभवात अकबर शेख यांच्या कामगिरीमुळे नवीन नोंद झाली आहे. 
पंचरंगी पोपट हा उत्तरपूर्व भारत आणि दक्षिणपूर्व आशियाचा पक्षी आहे. फळे हा त्यांचा आहार आहे. हा मुख्यतः जंगले व खुल्या जागेत असणारी वने येथे आढळणारा पक्षी आहे. हे पक्षी झाडाच्या ढोलीत घरटे करतात. घरटे करताना जुन्या ढोली फटी तर वापरतातच पण त्यासोबत मृत झाडांमध्ये स्वत: कोरून ढोली तयारही करतात. झाडातील ढोल्यांमध्ये चार ते पाच अंडी एकावेळी घालतात. 
हिरव्या रंगाचा असणारा हा पोपट 30 सेमी लांब असून त्याची शेपटी साधारण 18 सेमी असते. नर पोपटाचे डोके हे गुलाबी रंगाचे असते व डोक्‍याचा मागचा भाग हा फिकट निळ्या रंगाचा असतो. नराच्या मानेभोवती काळ्या रंगाचे कडे असते. खांद्याच्या आसपास एक लालसर ठिपका असतो. शेपटीचा सुरवातीचा भाग हा निळसर हिरवा असतो अन्‌ उर्वरित भाग हा पिवळसर असतो. मादीस डाग नसतात व डोके राखाडी रंगाचे असते. इतर पोपटांच्या तुलनेत या पोपटांचा आवाज मोठा असतो.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com