काय घडलं आज सोलापूरच्या गुन्हे जगतात? वाचा...

काय घडलं आज सोलापूरच्या गुन्हे जगतात? वाचा...

मला कमिशन दे.. नाहीतर तुझा व्यवसाय बंद पाडतो..! 

सोलापूर : माझ्या पुरवठादाराकडून माल उचलतो.., मला कमिशन दे.. नाहीतर तुझा व्यवसाय बंद पाडतो.. असे म्हणून दमदाटी करून मारहाण केल्याप्रकरणी वैजिनाथ ढंगापुरे, पॅटी, विजय लोकरे, विराज पाटील यांच्यावर एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

निशांत सिद्धाराम कलशेट्टी (वय 29, रा. सरवदेनगर, मुळेगाव रोड, सोलापूर) असे जखमीचे नाव आहे. त्यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 23 फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास विजयपूर रोडवरील चिंतामणी हॉटेलशेजारी सर्व्हिसिंग सेंटरमध्ये घडली. निशांत कलशेट्टी यांचा दूध पावडर खरेदी करून विक्री करण्याचा व्यवसाय आहे. निशांत यांना नंदिनी मिल्क प्रॉडक्‍ट यांचे टेंडर मिळाले असून त्या माध्यमातून दूध पावडर खरेदी करून सोलापुरात त्याची विक्री केली जात आहे. त्यांचा आतेभाऊ वैजिनाथ हा पाच वर्षांपूर्वी कर्नाटक राज्यातील शाळेमधील शालेय पोषण आहाराची दुध भुकटी आणून ती सोलापुरात विक्री करीत होता. निशांत यांचा व्यवसाय पाहून वैजिनाथ याने माझ्या पुरवठादाराकडून माल उचलतो, मला कमिशन दे.. नाहीतर तुझा व्यवसाय बंद पाडतो.. असे म्हणून दमदाटी केली. धमकीला घाबरून निशांत यांनी 10 हजार रुपये दिले होते. 23 फेब्रुवारी रोजी चिंतामणी हॉटेल परिसरात बोलावून वैजिनाथ व त्यांच्या सहकाऱ्यांनी तुझ्या व्यवसायात मिळालेल्या रकमेपैकी काही रक्कम मला दे नाहीतर तुला वेगळ्या ठिकाणी नेऊन मारहाण करतो.. तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करतो.. असे म्हणून दमदाटी केली, मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

किल्ल्यात गेल्यावर येतो मावळ्यांचा आवाज! अन्‌ मग.. 

मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा 
दुचाकी आणि टेम्पोमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुणीचा मृत्यू झाला. मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वार सोमनाथ घोडके (वय 28, रा. सैफुल, सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 17 फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वाचारच्या सुमारास सोलापूर- विजयपूर रस्त्यावर अर्जुन टॉवरसमोर घडली होती. ललिता अनिल कोळी (वय 32, रा. सुशीलनगर, विजयपूर रोड, सोलापूर) असे मृताचे नाव आहे. संगीता मारुती कोळी (वय 28, रा. सुशीलनगर, विजयपूर रोड सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. 

धक्का लागल्याच्या कारणावरून मारहाण 
चुलत भावाच्या लग्नावेळी वरातीमध्ये धक्का लागल्याच्या कारणारून तरुणास मारहाण करण्यात आली. याप्रकरणी आकाश, राहुल शिंगे, रोहित पासवान, रोहित गायकवाड, सिद्धार्थ कांबळे, सोनू गजधाने यांच्यासह इतर पाच ते सहाजण (सर्व रा. गुजरवस्ती, सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अमोल विजय दोरकर (वय 27, रा. जोशीगल्ली, शेळगी, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास भवानी पेठेतील वैदवाडी परिसरात घडली. अमोलच्या चुलत भावाच्या लग्नाच्या वरातीमध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून आरोपींसोबत किरकोळ वाद झाला होता. त्याच कारणावरून आरोपींनी रस्त्यात अडवून लोखंडी रॉडने, दगडाने आणि लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

एकतर्फी प्रेम प्रकरणातून महिलेचा विनयभंग ​

बोरामणीमध्ये घर फोडून चोरी 
बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथे मीना राहुल वाघमोडे (वय 26) यांचे घर फोडून चोरट्यांनी 20 हजारांची रोकड, दीड तोळे सोन्याचे दागिने, मोबाईल असा एकूण 45 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 23 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा ते 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात या कालावधीत घडली आहे. 

जेवणाचे पैसे मागितल्याने मारहाण 
जेवणाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून चिडून टॉमीने तरुणास मारहाण केली. याप्रकरणी सचिन दशरथ कदम (रा. धोत्री, ता. दक्षिण सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. लक्ष्मण मल्लिनाथ विभूते (वय 30, रा. धोत्री, ता. दक्षिण सोलापूर) यांनी वळसंग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

भांडण सोडविणाऱ्यास मारहाण 
भांडण सोडवण्यासाठी गेल्यानंतर मारहाण केल्याप्रकरणी अमोल मुकुंद हेळकर, विश्‍व मुकुंद हेळकर (रा. तळेहिप्परगा, ता. उत्तर सोलापूर) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. धनराज भीमण्णा म्हेत्रे (वय 22, रा. हगलूर, ता. उत्तर सोलापूर) असे जखमीचे नाव आहे. त्यांनी सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 23 फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली. मित्र श्रीशैल शिंदे यांच्या घरासमोर भांडण चालू होते. भांडण सोडविण्यासाठी गेल्यानंतर आरोपी अमोल व विश्‍व या दोघांनी तू आमचे भांडण सोडविणारा कोण.. असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 


गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या 
धुम्मा वस्ती येथे 14 वर्षांच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी पावणेतीनच्या पूर्वी राहत्या घरी घडली. रिंकू शंकर थेरटे (वय 14, रा. धुम्मा वस्ती, लक्ष्मी पेठ, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास रिंकूने घरात लोखंडी अँगलला ओढणीच्या साहायाने गळफास घेतला. तिला नातेवाइकांनी खाली उतरून बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाल्याची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलिस चौकीत झाली आहे. रिंकूचे आई-वडील मजुरी करतात. तिने आत्महत्या का केली याची माहिती मिळाली नाही, असे पोलिसांनी सांगितले. 

विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
21 वर्षीय तरुणीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सपना सूर्यकांत वाघमारे (वय 21, रा. विजयपूर नाका झोपडपट्टी, सोलापूर) असे विष प्राशन केलेल्या तरुणीचे नाव आहे. घरगुती कारणावरून सपना हिने मंगळवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला त्रास होऊ लागल्याने भावाने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलिस चौकीत झाली आहे. 

जिन्याचा दरवाजा तोडून महापालिका अधिकाऱ्याच्या घरात चोरी 
आनंद नगर (मजरेवाडी) येथील महापालिका अधिकारी चांदसाब हजरतसाब बागवान (वय 58) यांचे घर फोडून चोरट्याने एकूण दोन लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही घटना 20 ते 24 फेब्रुवारी या कालावधीत घडली. बागवान कुटुंबासह पुण्यात मुलगा मुबीन याच्याकडे गेले होते. 24 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजता सर्वजण परत आले. एलआयसीसाठी पाच हजार रुपये भरायचे असल्याने बागवान यांनी लोखंडी कपाट उघडले. तेव्हा त्यांना कपाटात ठेवलेले पैसे मिळाले नाहीत. याबाबत त्यांनी पत्नीकडे चौकशी केली, मात्र त्यांनी पैसे घेतले नसल्याचे सांगितले. कपाटातील दागिनेही मिळाले नाहीत. त्यानंतर बागवान यांनी घराच्या जिन्यावर जाऊन पाहिले असता त्यांना जिन्याचा दरवाजा उघडा दिसला. चोरट्याने घराच्या जिन्यावरून आत प्रवेश करून चोरी केल्याचे लक्षात आले. चोरट्याने पाच तोळे सोन्याच्या पाटल्या, अडीच तोळे सोन्याचे नेकलेस, एक तोळे सोन्याचे कानातील टॉप, एक तोळे सोन्याचे लॉकेट, एक तोळे सोन्याची बोरमाळ, पाच सोन्याच्या अंगठ्या, पाच हजारांची रोकड असा एकूण दोन लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. 

मुलीचा विनयभंग करणाऱ्यास तीन महिने शिक्षा 
10 वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी चिदानंद चाबुकस्वार (वय 32, रा. हत्तुरेवस्ती, सोलापूर) यास तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. जून 2016 मध्ये चिदानंद चाबुकस्वार याने 10 वर्षांच्या मुलीचा विनयभंग केला होता. याप्रकरणी विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपास करून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले होते. या खटल्याची न्यायालयामध्ये सुनावणी होऊन न्यायालयाने चिदानंद चाबुकस्वार याला दोषी धरून तीन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे ऍड. शीतल डोके यांनी तर आरोपीतर्फे ऍड. रियाज शेख यांनी काम पाहिले. 

सामूहिक अत्याचार प्रकरणातील सहा जणांना न्यायालयीन कोठडी 
16 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेतील संशयित सहा आरोपींची जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर मंगळवारी सहा संशयित आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. सप्टेंबर 2019 पासून 11 फेब्रुवारी 2020 या कालावधीत 16 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणात आजवर आठ संशयितांना अटक केली आहे. यातील पोलिस कोठडीची मुदत संपलेल्या संशयित आरोपी सचिन श्रीकांत राठोड (वय 24), प्रवीण श्रीकांत राठोड (वय 22), अक्षय विष्णू चव्हाण (वय 22, तिघे रा. प्रतापनगर, सोलापूर), करण विजयकांत भरले (वय 19, रा. सोरेगाव, सोलापूर), गौरव विशाल भोसले (वय 30, रा. निराळे वस्ती, सोलापूर), राज ऊर्फ राजकुमार सिद्राम देसाई (वय 23, रा. एसटी कॉलनी, विजापूर रोड, सोलापूर) यांना मंगळवारी न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. या सहा जणांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. संशयित आरोपी दिनेश परशु राठोड (वय 19, रा. प्रतापनगर, तांडा, सोलापूर), सतीश अशोक जाधव (वय 30, रा. प्रतापनगर तांडा, सोलापूर) या दोघांची पोलिस कोठडीची मुदत बुधवारी संपणार आहे. गुन्ह्यामध्ये सरकार पक्षातर्फे ऍड. शीतल डोके यांनी तर आरोपीतर्फे ऍड. राजेंद्र फताटे हे काम पाहत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com