सोलापूर बाजारात वह्या आणि पुस्तकांची खरेदीची गर्दी हरवली 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जून 2020

दरवर्षी जून महिन्यात मोठ्या प्रमाणात शाळा व महाविद्यालयांचे कामकाज सुरू होते. त्यासोबत स्टेशनरी दुकानांमध्ये वह्या, पुस्तके, दप्तर, वॉटरबॅग, कंपास व इतर साहित्य खरेदीसाठी नेहमीच गर्दी असते. यावेळी कोरोना संकटाने ही बाजारपेठ अगदी विस्कळित झाली आहे. 

 

सोलापूर: शाळा व महाविद्यालयांची घाई सुरू झाली असली तरी अद्याप वह्या व पुस्तकांचा बाजार अगदी थंड आहे. विद्यार्थी व पालक केवळ गरजेपुरतीच खरेदी करत आहेत. बारावीचा बदललेला अभ्यासक्रम वगळला तर इतर सर्वच इयत्तांसाठी लागणाऱ्या वह्या व पुस्तकांना फारसा प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. वह्याचे भाव देखील पंचवीस टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. 

हेही वाचाः योग आणि प्राणायाम निरोगी आरोग्याचा मुलमंत्र 

दरवर्षी जून महिन्यात मोठ्या प्रमाणात शाळा व महाविद्यालयांचे कामकाज सुरू होते. त्यासोबत स्टेशनरी दुकानांमध्ये वह्या, पुस्तके, दप्तर, वॉटरबॅग, कंपास व इतर साहित्य खरेदीसाठी नेहमीच गर्दी असते. यावेळी कोरोना संकटाने ही बाजारपेठ अगदी विस्कळित झाली आहे. 

हेही वाचाः सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी मार्तंडे 

ज्या दुकानदारांनी फेब्रुवारी व मार्चमध्ये वह्या व पुस्तकांची मागणी नोंदवलेली होती. त्यांना केवळ काही प्रमाणात पुरवठा करण्यात आला. उत्पादनासाठी पुरेसे कामगार उपलब्ध नसणे व नंतर वाहतुकीला देखील कामगारांची कमतरता होती. दुकाने बंद असल्याने पुरवठा देखील विस्कळित झाला आहे. नंतर अनलॉकमध्ये दुकाने उघडली तर ठरवलेल्या वेळेत साहित्याचा पुरवठा झालाच नाही. त्यामुळे दुकानांमध्ये अजूनही शालेय साहित्याची कमतरता आहे. 
जून महिन्यात प्रत्यक्षात शाळा व महाविद्यालये सुरू होण्याच्या बाबतीत अनेक अडचणी आहेत. त्यामुळे या महिन्यात तरी मुले शाळेत जाणार नाहीत, हे जवळपास निश्‍चित झाले आहे. विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रश्‍न पाहता विद्यार्थी निदान काही महिने तरी शाळेत जाऊ शकणार नाहीत. शाळांमधून पाठ्यपुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी केवळ गरजेपुरत्याच वह्यांची खरेदी केली आहे. त्यामुळे दुकानदारांच्या साहित्याची देखील फारशी विक्री झालेली नाही. 
बारावीचा अभ्यासक्रम बदलला आहे. त्यामुळे तीनही शाखांच्या पुस्तकांची खरेदी विद्यार्थी करीत आहेत. बारावी वगळता इतर कोणत्याही वर्गाच्या पुस्तकांची खरेदी फारशी नाही. अनब्रॅंडेड वह्या उत्पादकांनी वह्यांचे दर 20 ते 25 टक्‍क्‍यांनी वाढवले आहेत. ब्रॅंडेड वह्या उत्पादकांनी एमआरपीवर वही विकली जात असल्याने कोणतीही सूट दिलेली नाही. 

खरेदी जेमतेमच 
सध्या वह्या व पुस्तकांची खरेदी जेमतेमच आहे. शाळा व महाविद्यालये सुरू झाली नसल्याने ग्राहक घरी अभ्यास करण्यापुरती साहित्य खरेदी करत आहेत. 
-दर्शन घंटेवार, स्टेशनरी विक्रेता, सोलापूर  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crowding for books and naotebooks purchase is lost