पंढरपूर शहर व परिसरातील गावांमध्ये मंगळवारी संचारबंदी ! माघी यात्रेनिमित्त गर्दी होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश 

अभय जोशी 
Saturday, 20 February 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माघी दशमी रोजी रात्री बारापासून ते माघी एकादशी रोजी रात्री बारा या 24 तासांमध्ये पंढरपूर शहर आणि लगतच्या दहा गावांत संचारबंदी लागू राहणार आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माघी दशमी रोजी रात्री बारापासून ते माघी एकादशी रोजी रात्री बारा या 24 तासांमध्ये पंढरपूर शहर आणि लगतच्या दहा गावांत संचारबंदी लागू राहणार आहे. या काळात प्रवासी वाहतूक नियंत्रित राहणार आहे; परंतु पंढरपूरला येणाऱ्या पायी दिंड्यांना मात्र प्रतिबंध करण्यात आला आहे. याविषयी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश दिले आहेत. 

माघी एकादशीचा सोहळा 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यात्रेपूर्वीच गेल्या चार दिवसांपासून शहरात भाविकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे एकादशीच्या वेळी संचारबंदी राहणार किंवा नाही, याविषयी भाविक, स्थानिक नागरिक आणि विशेषतः व्यापाऱ्यांमध्ये उत्सुकता होती. काल (शुक्रवारी) रात्री उशिरा जिल्हाधिकारी यांनी यात्रेविषयी सविस्तर आदेश काढले आहेत. 

माघी यात्रेसाठी सुमारे तीन ते चार लाख भाविक येत असतात. गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी दक्षता म्हणून 22 फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजल्यापासून ते 23 फेब्रुवारी रोजी रात्री बारापर्यंत या चोवीस तासांत पंढरपूर शहरात तसेच भटुंबरे, चिंचोली भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, वाखरी, कोर्टी, गादेगाव, शिरढोण आणि कौठाळी या शहरांलगतच्या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय साथ नियंत्रण अधिनियम 1897 मधील तरतुदीनुसार संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. 

प्रवासी वाहतूक सेवा नियंत्रित 
माघी वारीला बहुसंख्य वारकरी हे रेल्वे, एसटी बस व खासगी वाहनांमधून येत असतात. माघ शुद्ध दशमी (ता. 22) व माघ शुद्ध एकादशी (ता. 23) या काळात ही वाहतूक सेवा व इतर सेवा पूर्णपणे बंद न करता नियंत्रित ठेवावी; जेणेकरून सर्वसामान्य प्रवासी, वैद्यकीय सेवा व इतर सेवा चालू राहतील. मंदिर परिसरापासून दूर अंतरावर सर्वसामान्य प्रवासी उतरेल. याबाबत आवश्‍यक ते नियोजन पोलिस विभाग, परिवहन विभाग आणि एसटी महामंडळ हे करणार आहेत. 

पायी दिंड्यांना प्रतिबंध 
माघी यात्रेसाठी राज्यभरातून 250 पेक्षा जास्त पायी दिंड्या पंढरपूरला येत असतात. या दिंड्या मराठवाडा, कोकण, विदर्भ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, दक्षिण महाराष्ट्र या ठिकाणांहून येतात. कोरोना विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर या पायी दिंड्यांना पंढरपूरच्या दिशेने प्रस्थानास बंदी करण्यात आली आहे. 

मठातील वारकरी संख्या नियंत्रित असावी 
पंढरपूर शहर व परिसरामध्ये जवळपास 1200 मठ असून यात्रेपूर्वी काही दिवस अगोदर या मठांमध्ये बाहेरगावाहून वारकरी वास्तव्यास येण्याची शक्‍यता आहे. तसेच 65 एकर परिसर, चंद्रभागा नदी पात्र या ठिकाणीही वारकरी वास्तव्यास येत असतात. स्थानिक नगरपरिषदेकडून वारी संपेपर्यत मठांची दररोज तपासणी केली जाणार आहे. मठामध्ये नव्याने येणाऱ्या लोकांना बंदी करण्याबाबतच्या उपाययोजना उपविभागीय अधिकारी पंढरपूर व मंदिर समिती हे करतील. पोलिस विभागामार्फत मठ प्रमुखांच्या बैठका घेऊन त्यांना सीआरपीसी 149 प्रमाणे नोटिसा बजावतील. 

श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मातेच्या दर्शनाबाबत 
माघ शुद्ध दशमी (ता. 22) आणि माघ शुद्ध एकादशी (ता. 23) असे दोन दिवस भाविकांसाठी मंदिर बंद ठेवण्यात यावे, तथापि "श्रीं'चे परंपरेनुसार चालत असलेले सर्व नित्योपचार मंदिर समितीमार्फत केले जातील. 

ह.भ.प. वासकर महाराज यांच्या दिंडीस प्रवेश देण्याबाबत 
माघ दशमी दिवशी ह.भ.प. वासकर महाराज यांच्या दिंडीस मंदिरात पालखी दरवाजातून प्रवेश देण्यात येतो. यंदा वासकर महाराज यांच्या दिंडीस एक अधिक पाच वारकरी व मानकरी यांच्या उपस्थितीत मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. 

श्री विठ्ठल व श्री रुक्‍मिणीमातेच्या नित्यपूजेबाबत 
माघी एकादशी (ता. 23) रोजी होणाऱ्या श्री विठ्ठल व श्री रुक्‍मिणीमातेची नित्यपूजा मंदिर समितीचे सहअध्यक्ष, सदस्य यांच्या हस्ते सपत्निक करण्यात येते. श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे एक सदस्य यांच्या हस्ते सपत्निक (दोन अधिक तीन एकूण पाच) व श्री रुक्‍मिणीमातेची नित्यपूजा मंदिर समितीचे एक सदस्य यांच्या हस्ते सपत्निक (दोन अधिक तीन एकूण पाच) यांना करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

श्री औसेकर महाराज यांचे चक्रीभजन 
माघ शुद्ध त्रयोदशी (ता. 25) रोजी ह.भ.प. औसेकर महाराज यांना एक अधिक अकरा मानकरी यांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल मंदिर सभामंडपात योग्य ती खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने चक्रीभजन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

श्री पुंडलिकराय उत्सवाचा काला 
माघ शुद्ध त्रयोदशी (ता. 25) रोजी श्री पुंडलिकराय उत्सवाचा काला या कार्यक्रमास एक अधिक पंचवीस वारकऱ्यांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे. हा काला त्या दिवशी सकाळी दहा ते बारा या वेळेत पार पडणार आहे. 

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यात्रेतील अन्य व्यवस्थेविषयीच्या सूचना आदेशात सविस्तर नमूद केल्या आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A curfew was imposed in Pandharpur city and surrounding villages on Tuesday