सावधान... सायबर गुन्हेगारांचे महाराष्ट्रावर लक्ष्य 

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

मुंबईत सर्वाधिक गुन्हे 
राज्यात 2015 ते ऑक्‍टोबर 2019 या कालावधीत सायबर क्राईमच्या 16 हजार 51 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी चार हजार 434 गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला असून पाच हजार 425 संशयीत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. या कालावधीत सर्वाधिक सहा हजार 769 गुन्हे मुंबईत घडले असून नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना दक्ष राहायला हवे. 
- बालसिंग रजपूत, पोलिस अधीक्षक, सायबर क्राईम, मुंबई

सोलापूर : तंत्रज्ञानाच्या प्रगतीत महाराष्ट्राची घोडदौड सुरु असतानाच राज्यातील नागरिकांमध्ये सायबर गुन्हेगारांची भिती वाढू लागली आहे. डिजीटल इंडियाच्या धर्तीवर सर्व व्यवहार कॅशलेस होत आहेत. परंतु, दुसरीकडे चार वर्षांत राज्यातील 16 हजार 439 जणांची सुमारे दहा हजार कोटींची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. मनुष्यबळाचा अभाव, सायबर तपासातील निर्बंधामुळे आतापर्यंत केवळ चार हजार 434 गुन्ह्यांचाच तपास पूर्ण झाला असून उर्वरित नागरिकांचे हेलपाटे अद्याप संपलेले नाहीत. 

हेही वाचा - महाराष्ट्र बंद : सोलापुरात महापालिका परिवहन व्यवस्था कोलमडली 

जास्त रकमेचे अमिष दाखवून सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. दुसरीकडे बॅंकांमधील खातेदारांची माहिती घेऊन परस्पर पैसे काढून घेण्याचेही प्रकार वाढत आहेत. फसवणूक झालेल्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक, नोकदार, विविध वित्तीय संस्थांचा समावेश आहे. विशेष म्हणजे काही संस्थांमध्ये सायबर क्राईम होऊ नयेत म्हणून ठोस उपाययोजनाच नसल्याचे चित्र आहे. आंतरराज्य गुन्हेगारांकडून नागरिकांची फसवणूक केली जात असून नागरिकांनी यापासून सावध राहायला हवे, असे आवाहन सायबर तज्ज्ञांकडून केले जात आहे. समोरील व्यक्‍तीचा विश्‍वास संपादन करून बॅंक खात्याची माहिती संकलित केली जात असून त्याद्वारे ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. दुसरीकडे मनुष्यबळाच्या अभावामुळे व तपासातील तांत्रिक त्रुटींमुळे बहूतांश प्रकरणांचा तपास अद्यापही पूर्ण झाला नसून फसवणुकीची रक्‍कमही वाढू लागली आहे. 

हेही वाचा - राजू शेट्टींचे ठाकरे सरकारबाबत मोठे विधान 

सायबर गुन्ह्यांची स्थिती 

  • वर्ष...............दाखल गुन्हे 
  • 2015.........2,195 
  • 2016.........2,380 
  • 2017.........4,035 
  • 2018.........3,713 
  • 2019.........4,116 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cyber criminals target Maharashtra