देगावच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरची वुई वुईल हेल्प मोहिम गरजवंतांसाठी ठरली "देवदूत' 

valuj engineer.jpg
valuj engineer.jpg

वाळूज(सोलापूर): लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या आणि हाताला काम नसल्याने उपासमारीला तोंड देणाऱ्या अनेक कुटुंबांची अवस्था प्रत्यक्ष बघितली. रस्त्याने शेकडो किलोमीटरचा प्रवास करणारे मजूर आणि त्यांची लहान लहान लेकरं अनवाणी चालताना आणि बिस्किटाच्या एका पुड्यासाठी हात पसरताना पाहिले आणि काळजात चर्रर्र झाले आणि तेव्हाच ठरवले आपण यांच्यासाठी काहीतरी मदत करायची. सोशल मीडियाद्वारे मदतीचे आवाहन केले आणि "माणुसकीचा जिवंत झरा पाझरू लागला', त्यातूनच जमा झाली सव्वापाच लाख रुपयांची मदत. या पैशातून जीवनावश्‍यक वस्तूंचे किट तयार करून गरजवंतांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत जाऊन ती त्यांना दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील कृतज्ञतेचे भाव बघून समाजकार्याची ऊर्जा मिळत मिळाली. . 

मूळचा देगाव (वा) (ता. मोहोळ) येथील आणि सध्या वैराग (ता. बार्शी) येथे स्थायिक झालेले सचिन आतकरे यांचे कुटुंब. सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून पुणे येथे काम करणाऱ्या सचिन आतकरे यानी लॉकडाउनमुळे एक वेळच्या अन्नासाठी महाग झालेला अनेक कुटुंबांचा संसार लोकसहभागातून उभा केला आहे. 

यासाठी फेसबुक, व्हॉट्‌सऍप, ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या साहाय्याने मदतीसाठी मित्रांना आवाहन केले. सकारात्मक पोस्टद्वारे आवाहन करून समाजात प्रचंड सकारात्मकता निर्माण केली. लॉकडाऊन असल्याने कंपनीची दैनंदिन कामे सध्या वैराग (ता. बार्शी) येथील घरातूनच लॅपटॉपद्वारे ऑनलाइन चालू आहे. ते काम करत करत अनेक गरजूंना "वुई वुईल हेल्प' ही मोहीम फेसबुकवरील मित्रांसोबत सुरू करून त्याद्वारे मदत गोळा करू लागल्याचे त्यांनी सांगितले. अनेक मित्रांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह स्वतः प्रत्यक्ष फील्डवर उतरून अनेक गावातल्या 700 कुटुंबाना रेशन पोहोच केले. 

आतापर्यंत केलेली मदत 
जवळपास महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील खरोखरच ज्यांना अन्नाची आणि मदतीची गरज आहे, अशाच लोकांना मदत पोहोच केली. 700 पेक्षा जास्त कुटुंबांना रेशन किट्‌स पोहोच केले आहेत. जवळजवळ दोन हजार लोकांना याचा फायदा झाला आहे. पोलिसांना दोनशे पन्नास सेफ्टी पीपीई किट्‌स आणि हॉस्पिटलला 51 किटचे वाटप केले आहे. घर जळालेल्या किंवा वादळाने नुकसान झालेल्यांना मदत केली आहे. झारखंड येथे कामासाठी गेलेल्या 75 मजुरांना महाराष्ट्रात आणण्यात मदत केली आहे. अनेक कुटुंबांना औषधांसाठी आर्थिक मदत, तर काहींना औषधे पोहोच केली आहेत. वृद्धाश्रमाला दहा हजार रुपयांचे रेशन दिले आहे. या सर्व कामात फेसबुकवरील मित्रांची खूप मदत झाली.

प्रत्येकाने लावला हातभार 

आतापर्यंत जमा रक्कम साधारण पाच लाख 25 हजार रुपये असून, वापरलेली रक्कम पाच लाख आणि बाकीची रक्कम वापरण्याचं काम सुरू आहे. हे सर्व काम फक्त आणि फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून शक्‍य झाले.

सचिन आतकरे, देगाव जि.सोलापूर  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com