मोहोळच्या रोपवाटिकेने मिळवून दिला 71 लाखांचा महसूल : "फलोत्पादन'चे कृषी महासंचालक जमदाडे

राजकुमार शाह 
Friday, 23 October 2020

जिल्ह्यात मोहोळच्या रोपवाटिकेचे क्षेत्र कमी आहे, तरीही कृषी पर्यवेक्षक श्री. पवार यांनी चांगले व्यवस्थापन करून रोपे विक्रीतून शासनाला 71 लाखांचा महसूल जमा करून दिला आहे. इतका महसूल इतर कुठल्याही रोपवाटिकांमधून जमा झाला नाही, ही बाब अत्यंत कौतुकास्पद असल्याचे राज्याचे फलोत्पादन विभागाचे कृषी महासंचालक शिरीष जमदाडे यांनी सांगितले.

मोहोळ (सोलापूर) : मोहोळची फळ रोपवाटिका ही जिल्ह्यातील सर्व रोपवाटिकांपेक्षा आदर्श असून, येथील व्यवस्थापन चांगले आहे. ही रोपवाटिका मॉडेल रोपवाटिका बनवा, अशी सूचना राज्याचे फलोत्पादन विभागाचे कृषी महासंचालक शिरीष जमदाडे यांनी केली. 

हेही वाचा : शिक्षक पारडे, शिवगुंडे, भांबुरे यांच्या प्रकल्पांची "राज्यस्तरीय' निवड ! जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक 

महासंचालक श्री. जमदाडे यांनी मोहोळच्या शासकीय फळ रोपवाटिकेला अचानक भेट दिली. त्या वेळी तेथील कामकाज पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी भगवा डाळिंब, सुपर भगवा, चिक्कू, केशर व हापूस आंबा, लिंबू या रोपांसह आंबा, डाळिंब, लिंबू, पेरू, चिक्कू या मातृवृक्षाच्या झाडांचीही पाहणी केली. 

जिल्ह्यात मोहोळच्या रोपवाटिकेचे क्षेत्र कमी आहे, तरीही कृषी पर्यवेक्षक श्री. पवार यांनी चांगले व्यवस्थापन करून रोपे विक्रीतून शासनाला 71 लाखांचा महसूल जमा करून दिला आहे. इतका महसूल इतर कुठल्याही रोपवाटिकांमधून जमा झाला नाही, ही बाब अत्यंत कौतुकास्पद असल्याचे श्री. जमदाडे यांनी सांगितले. 

हेही वाचा : दुर्मिळ राज्य पक्षी "हरियाल'चा थवा घालतोय सोलापूर जिल्ह्यात घिरट्या ! 

या वेळी महासंचालक जमदाडे यांनी कृषी पर्यवेक्षक डी. टी. पवार यांचे अभिनंदन केले, तसेच डाळिंबाच्या सोलापूर लाल व अनारदाना या वाणांची लागवड करण्याचीही सूचना दिली. 

या वेळी पर्यवेक्षक श्री. पवार यांनी रोपवाटिकेसाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली, त्या वेळी निधीचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन महासंचालक श्री. जमदाडे यांनी दिले. 

श्री. जमदाडे यांच्यासमवेत उपविभागीय कृषी अधिकारी जयंत कवडे, तालुका कृषी अधिकारी अतुल पवार, पेनूरचे मंडळ अधिकारी एस. बी. मोरे तसेच रोपवाटिकेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Director General of Agriculture said that make Mohols fruit nursery a model