पालकमंत्री भरणे व आवताडेंच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात आलंय चर्चेला उधाण !

हुकूम मुलाणी 
Monday, 31 August 2020

पालकमंत्री भरणे कोरोना संकटाच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या उपाययोजनांबाबत आयोजित आढावा बैठकीच्या निमित्ताने मंगळवेढा येथे आले होते. आढावा बैठक संपवून जात असताना अचानक त्यांनी जिल्हा बॅंकेचे संचालक बबनराव आवताडे यांच्या संपर्क कार्यालयात उपस्थिती लावली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 

मंगळवेढा (सोलापूर) : मंगळवेढा तालुक्‍यातील सहकार क्षेत्रावर एकहाती वर्चस्व असलेल्या जिल्हा बॅंकेचे संचालक बबनराव आवताडे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा चर्चेला उधाण आलं आहे. 

हेही वाचा : आपल्या प्रेमामुळे परिचारक कुटुंब संकटातून बाहेर पडेल : आमदार प्रशांत परिचारक 

पालकमंत्री भरणे कोरोना संकटाच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या उपाययोजनांबाबत आयोजित आढावा बैठकीच्या निमित्ताने मंगळवेढा येथे आले होते. आढावा बैठक संपवून जात असताना अचानक त्यांनी जिल्हा बॅंकेचे संचालक बबनराव आवताडे यांच्या संपर्क कार्यालयात उपस्थिती लावली. या वेळी पालकमंत्र्यांचा खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कारादरम्यान आमदार भारत भालके यांचीही उपस्थिती होती. मंगळवेढ्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व सहकार क्षेत्रावर बबनराव आवताडे यांचे एकहाती वर्चस्व आहे. त्यांच्या शब्दाला सहकार क्षेत्रामध्ये एक मोठे वलय असून 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेची उमेदवारी असलेल्या पुतणे समाधान आवताडे यांचा प्रचार केला. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार असलेल्या समाधान आवताडे यांच्यासाठी प्रचार यंत्रणा लावली होती. त्या निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षांची उमेदवारी व राजकीय फायदा न घेता पंढरपूर विधानसभा मतदारसंघात आवताडे यांना मिळालेली मते निर्णायक होती. पण निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत आमदार भालके व आवताडे यांचे राजकीय आरोप-प्रत्यारोप तितके झाले नव्हते. 

हेही वाचा : वांगरवाडीतील चिमुकल्याचे खून प्रकरण : अनैतिक संबंधातून आईनेच गळा आवळला; प्रियकराला अटक 

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत आवताडेंची भूमिका देखील निर्णायक ठरली होती. अजूनही तालुक्‍यातील राजकीय वर्तुळामध्ये बबनरावांचा दबदबा कायम राहिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून सुरवातीच्या काळात ते राष्ट्रवादीबरोबर होते. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या भेटीनंतर भविष्यात तालुक्‍यातील राजकीय गणिते बदलणार का? या चर्चेबरोबरच श्री संत दामाजी कारखान्याची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे, अशा परिस्थितीत या भेटीतून नवीन राजकीय गणिते मांडली जाणार का? याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून, भविष्यात काय राजकीय घडामोडी घडतात, याकडे देखील जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discussions are going on in the political circles after the visit of Guardian Minister Bharane and Avtade