केत्तूरमध्ये सर्व विषयाचे एकच पुस्तक वाटप केल्याने विद्यार्थ्यांची दफ्तराच्या ओझ्यातून सुटका 

राजाराम माने
शुक्रवार, 10 जुलै 2020

विद्यार्थ्यांना वर्षभरात जेवढे विषय शिकायचे आहेत ते सर्व विषय एकाच पुस्तकात समाविष्ट केले आहेत. या पुस्तकाचेही तीन भाग केलेले आहेत. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत ऑल इन वन असलेले एक पुस्तक असणार आहे. ऑक्‍टोबर ते डिसेंबर आणि जानेवारी ते मार्च या तीन तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये बाकीचे दोन भाग विद्यार्थ्यांना दिले जातील.

केत्तूर(सोलापूर)ः विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या दप्तराच्या ओझ्याची गंभीर समस्या झाली असताना पालकांची चिंता वाढलेली होती. पण यावर्षी महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने एक स्तुत्य पाऊल उचलले आहे. विद्यार्थ्यांना सर्व विषयाचे एकच पुस्तक घेऊन शाळेत येता येईल अशी सोय यावर्षीपासून केलेली आहे. 

हेही वाचाः धक्कादायकः पंढरपुरात धारदार शस्त्राने विवाहितेचा खून 

विद्यार्थ्यांना वर्षभरात जेवढे विषय शिकायचे आहेत ते सर्व विषय एकाच पुस्तकात समाविष्ट केले आहेत. या पुस्तकाचेही तीन भाग केलेले आहेत. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत ऑल इन वन असलेले एक पुस्तक असणार आहे. ऑक्‍टोबर ते डिसेंबर आणि जानेवारी ते मार्च या तीन तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये बाकीचे दोन भाग विद्यार्थ्यांना दिले जातील. एकाच पुस्तकात सर्व विषयाचे धडे विषयानुसार उपलब्ध झाले आहेत. एकंदरीत या वर्षीपासून विद्यार्थ्यांना पाठीवरच्या ओझ्यापासून सुटका मिळणार हे निश्‍चित. 

हेही वाचाः सोलापूर जिल्ह्यात यावर्षी पन्नास हजार शेतकऱ्यांना मिळाले पीककर्ज 

शासनाच्या या निर्णयाचा सर्व शिक्षक पालक विद्यार्थ्यांमधून स्वागत होत आहे. करमाळा तालुक्‍यात सदर पुस्तके आली असून ती केंद्र शाळेमार्फत इतर शाळांना पोहोच करण्यात आली आहेत. 

दफ्तराचे पंच्याहत्तर टक्के ओझे कमी 
विद्यार्थ्यांना शाळेत येताना रोज सर्व विषयांची पुस्तके व वह्या आणाव्या लागायच्या. लहान मुलांना या ओझ्यामुळे पाठदुखी सारखे आजार सुरू झाले होते. आता जवळ जवळ 75 % ओझे कमी झाल्याने विद्यार्थ्यांना आता मोकळेपणाने शाळेत येता जाता येईल. 
- विकास काळे, शिक्षक, केत्तूर, 

दफ्तराच्या ओझ्याचा ताण झाला कमी 
आमच्या पाल्यांच्या पाठीवरच्या ओझ्याचे काय करावे हे कळत नव्हते. घरी आल्यानंतर मुले दफ्तराच्या ओझ्याने दमुन गेलेली असायची. पण आता ओझे खूपच कमी झाल्याने मुलांचा खूपच ताण कमी होणार आहे". 
- सुप्रिया जरांडे,पालक. 

 

संपादनः प्रकाश सनपूरकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distributing a single book on all subjects in Kettur relieves the students from the burden of school