पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात 350 नागरिकांना आरोग्य विमा कार्डचे वाटप 

प्रमोद बोडके
Saturday, 19 September 2020

प्रभाग दोनमध्ये रक्‍तदान शिबिर 
सेवा सप्ताहानिमित्त प्रभाग दोनमध्ये नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांच्या पुढाकारातून रक्तदान शिबिर झाले. या शिबिरात 177 बाटल्याचे रक्त संकलन करण्यात आले. शिबिराचे उद्‌घाटन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे, शिवानंद पुजारी, नगरसेवक डॉ. किरण देशमुख, प्रा. नारायण बनसोडे, शंकर शिंदे, सोमनाथ रगबल्ले उपस्थित होते. शिबिरासाठी हेडगेवार रक्तपेढीचे रक्तसंकलन केले. 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गरिबांच्या हितासाठी 70 योजना अंमलात आणल्या आहेत. या योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी मोदी यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे. गरिबांना मोठ्या आजारांचा सामना करावा लागल्यास देशातील नामांकित हॉस्पिटलमध्ये पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळवून देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आयुष्यमान भारत ही योजना कार्यान्वित केली. या योजनेंतर्गत गोरगरिबांना मोफत उपचार मिळणार आहेत. मोदी यांनी घेतलेल्या धाडसी व लोकोपयोगी निर्णयांच्या समर्थनार्थ जनतेने या पुढेही पंतप्रधान मोदी व भाजपच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन माजी मंत्री व सोलापुरातील भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले. 

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर भाजपच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या सेवा सप्ताहानिमित्त आज प्रभाग 1 मधील मड्डी वस्ती परिसरातील 350 नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेच्या आरोग्य विमा कार्डचे वितरण आमदार देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कोरोना काळात उत्कृष्ट काम करणारे मनपा डॉक्‍टर, परिचारिका, कर्मचारी यांचा तुळशीरोप देऊन आमदार देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सेवा सप्ताहअंतर्गत आमदार विजयकुमार देशमुख यांच्यातर्फे व जगदेव बंडगर यांच्या सहकार्याने या आरोग्य विमा कार्डचे वितरण करण्यात आले. यावेळी नगरसेवक डॉ. किरण देशमुख, नगरसेविका निर्मला तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती. नगरसेवक डॉ. किरण देशमुख म्हणाले, गेल्या 70 वर्षात शासनाने गोरगरिब जनतेचा विचार केला नाही. त्यामुळे ही जनता देशोधडीला लागली आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून गोरगरिब जनता, शेतकरी यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. यापुढील काळातही भाजप गोरगरिब जनतेच्या हितासाठीच काम करेल. यावेळी चंद्रकांत तांबे, निर्मला जाधव, सोनाली बंडगर, राज बंडगर, डॉ. जाधव, सिद्धेश्‍वर जालिमिंची, बालाजी ग्रुपचे कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution of health insurance cards to 350 citizens in Solapur on the occasion of Prime Minister Modi's birthday