अभियंत्यांच्या कौशल्याने फिरतेय सोलापूरचे अर्थचक्र 

प्रमोद बोडके
Monday, 14 September 2020

हातमाग, शटल लूम ते आधुनिक रॅपिअर, एअरजेट लूम 
सोलापुरात पूर्वी हातमागावर धोती, साड्या विणल्या जायच्या. त्यानंतर ऑटो व शटल लूमवर जेकार्ड चादर व टॉवेलची उत्पादने घेतली जात आहेत. हातमागावरील उत्पादनांचा वेग प्रतिमिनीट 50 ते 60 आरपीएम असायचा. शटल लूमचा वेग 115 आरपीएम व ऑटो लूमचा वेग 130 आरपीएम प्रतिमिनीट आहे. त्यानंतर आधुनिकीकरणाला सुरवात होऊन चिनी बनावटीचे रॅपिअर लूम सोलापूरच्या टेक्‍स्टाईल इंडस्ट्रीमध्ये दाखल झाले, ज्याचा वेग 200 आरपीएम प्रतिमिनीट आहे. युरोपच्या रॅपिअर लूमचा वेग 300 ते 350 आरपीएम आहे. रॅपिअर लूमच्या उत्पादनांमध्ये खराबी कमी मात्र मशिन मेंटेनन्सचा खर्च जास्त आहे. आता त्याहून आधुनिक एअरजेट लूम सोलापुरात दाखल झाले असून त्याचा वेग 450 ते 500 आरपीएम प्रतिमिनीट आहे. रॅपिअर व एअरजेटवर कापड, टॉवेल, चादर, बेडशीट आदींची उत्पादने वेगवान व दर्जेदार होतात. मात्र रॅपिअर लूमची किंमत 35 लाख व एअरजेट लूमची किंमत 50 लाख प्रतिलूम असल्याने शहरातील बोटावर मोजण्याइतक्‍या उत्पादकांकडेच हे लूम उपलब्ध आहेत. 

भारतरत्न सर विश्‍वैश्‍वरय्या मोक्षगुंडम यांची जयंती अर्थात अभियंता दिनानिमित्त अभियंत्यांच्या कुशलतेला स्मरण करण्याचा आजचा दिवस. तंत्रज्ञान आज मानवी जीवनाचा अविभाज्य अंग झाला आहे. दैनंदिन जीवनातील घटना घडामोडी असोत की रोजीरोटीची निर्मिती, आज अवघड गोष्टी तंत्रज्ञानाने सोप्या केल्या आहेत. शेतीप्रधान असलेल्या सोलापूर जिल्ह्याचे अर्थचक्र अभियंत्यांच्या कुशलनेते अधिक गतिमान झाले आहे. सोलापूर जिल्ह्याच्या विविध क्षेत्रात अभियंत्यांनी दिलेले योगदान, अभियंत्यांच्या कौशल्याने जिल्ह्याच्या विकासाला मिळालेली गती यावर टाकलेला हा प्रकाश. 

दुष्काळी भागाचा कायापालट 
दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्याला देशातील सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा करण्यात अभियंत्यांचा मोठा वाटा आहे. अशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा उजनी ते सीना नदी दरम्यान साकारला. उजनीचे पाणी सीना नदीत आणि सीना नदीतून हे पाणी जिल्ह्याच्या व महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या अक्कलकोट तालुक्‍यातील कुरनूर धरणापर्यंत पोहोचविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उपसा सिंचन योजना, लांबोटी, देगाव एक्‍सप्रेस, सावळेश्‍वर या ठिकाणी साकारण्यात आलेला जलसेतू जिल्ह्यातील अभियांत्रिकीचा उत्कृष्ठ नमुना मानला जात आहे. अभियांत्रिकीचा असाच एक प्रयोग सध्या निरेचे पाणी उजनीत आणण्यासाठी आणि उजनीचे पाणी मराठवाड्याला देण्यासाठी साकारला जात आहे. 

ब्रिज कम बॅरेजचा पहिला प्रयोग 
सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या विजापूर व कोल्हापूर या महामार्गावरील भीमा व सीना नदीवर पूल साकारण्यात येत आहे. महामार्गासाठी पूल आणि परिसरातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी बॅरेज अशी दुहेरी संकल्पना एकाच प्रकल्पात साकारण्यासाठी देशातील पहिली "ब्रिज कम बॅरेज' संकल्पना सोलापूर जिल्ह्यात अस्तित्वात आली आहे. भविष्यात येथून जलवाहतूक सुरु करण्याचे निश्‍चित झाल्यासही या ब्रिज कम बॅरेजचा उपयोग होणार आहे. कमी खर्चात ब्रिज आणि बॅरेज साकारणारा हा प्रयोग सोलापूर जिल्ह्यात राबविला जात आहे. 

महामार्ग चौपदरीकरणातून विकासाचा महामार्ग 
दक्षिण भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यातून जाणारे सर्वच महामार्गाचे चौपदरीकरण होत आहे. विजापूर, धुळे, पुणे, कोल्हापूर, हैदराबाद, अक्कलकोट या महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे जिल्ह्याला विकासाचा नवा मार्ग सापडला आहे. या शिवाय पंढरपुरात येणारे संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी मार्ग व संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचेही चौपदरीकरण युध्द पातळीवर सुरू आहे. पंढरपुरला येणाऱ्या सर्वच मार्गांचे भक्तीमार्ग म्हणून चौपदरीकरण होत असल्याने जिल्ह्यातील दळण वळणाच्या पायाभूत सुविधांमध्ये मोलाची भर पडली आहे. सोलापुरातील जडवाहतूक शहराच्या बाहेरून काढण्यासाठी सोलापूर शेजारी होत असल्याने बाह्यवळण रस्त्यामुळे सोलापुरातील अपघातांचे प्रमाण येत्या काळात कमी होणार आहे. 

ऊर्जा निर्मितीचे यशस्वी तंत्रज्ञान 
आहेरवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथील एनटीपीसी हा वीज निर्मिती प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील एक वेगळा प्रयोग आहे. कोळशाच्या माध्यमातून वीज निर्मिती या प्रकल्पातून केली जाते. या ठिकाणी उभारलेली चिमणी ही खूप उंच आहे. ती चिमणी उभी करणाऱ्या अभियंत्यांचे कौतुक आहे. सहा हजार 300 मेगावॉट क्षमतेचे दोन वीजनिर्मितीचे संच त्याठिकाणी आहेत. हा प्रकल्प कार्यान्वीत होण्यासाठी पाण्याची आवश्‍यकता आहे. उजनी धरणातून याठिकाणी पाणी आणले आहे. त्या पाण्याचा वापर मोठ्या खुबीने केला आहे. या प्रकल्पातून तयार होणारी "ऍश' उंचावर जावी यासाठी त्या चिमणीची उंची खूप जास्त ठेवली आहे. राज्यात मोजक्‍याच ठिकाणी एनटीपीसी हा प्रकल्प कार्यान्वीत आहे. त्यात सोलापूरचा क्रमांक लागतो. या प्रकल्पाची उभारणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केली आहे. कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये, याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. कोणत्याही कामापूर्वी सुरक्षिततेचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे कोणतीही दुर्घटना होत नाही. 

रेल्वे हॉस्पिटलने तयार केले दोन रोबोट 
कोरोनाचा प्रवेश सोलापुरात झाला आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार रेल्वे हॉस्पिटलमध्येही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु झाले. सुरवातीच्या काळात डॉक्‍टर आणि रुग्णांमध्ये मोठी भीती होती. मात्र, अशा परिस्थितीत रुग्णांची देखभाल, त्यांच्याशी संवाद साधून रुग्णांची गरज पूर्ण करण्याच्या हेतूने रेल्वेच्या मेकॅनिक विभागाने सोलापुरातील नवअभियंत्यांना सोबत घेऊन एक रोबोट तयार केला. रोबोटच्या माध्यमातून रुग्ण आणि डॉक्‍टरांमधील सोशल डिस्टन्स कायम राहीला. आता रेल्वेने पहिल्या रोबोटमधील त्रुटी दूर करून दुसरा रोबोट तयार केला. त्यामध्ये रुग्णाचे तापमान, ऑक्‍सिजन लेव्हल मोजणे सोयीस्कर झाले. तर रुग्णांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलणेही सोपे झाले. 15 दिवसांत तयार केलेल्या रोबोटला एक लाख 40 हजारांचा खर्च आला. सोलापुरातील प्रयोग पाहून पुण्यातील रेल्वे हॉस्पिटलने रोबोट तयार करुन मागितला. त्यांनाही एक रोबोट तयार करुन देण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भीतीच्या वातावरणातही रोबोटने डॉक्‍टर आणि रुग्णांमधील अंतर कमी होऊ दिलेले नाही, अशी माहिती डॉ. आनंद कांबळे यांनी दिली. 

सोलापूर होऊ लागले स्मार्ट 
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यात सोलापूरचा समावेश झाला. स्मार्ट सिटी योजनेतून सोलापूरचे सौंदर्य खुलू लागले आहे. होम मैदानाचे सुशोभिकरण असो की रंगभवन चौकाचे बदललेले स्वरुप हे स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून शक्‍य झाले आहे. सोलापुरातील महत्त्वाचे रस्ते, इंदिरा गांधी स्टेडियम या महत्त्वाच्या ठिकाणांचे सुशोभिकरण होऊ लागले आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून सोलापूरसाठी दोन उड्डाणपूलांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. सोलापूर शहरासह परिसरातील विकासकामांमध्ये अभियांत्रिकीचा उत्कृष्ठ नमुना सध्या बघायला मिळत आहे. 

समाजानेही द्यावे प्रोत्साहन 
कष्टकरी शेतकऱ्यांना शाश्‍वत पाणी मिळाल्यास शेतकऱ्यांसाठी कोणतीही गोष्ट अशक्‍य नसते. जलसंपदा, जलसंधारण या माध्यमातून शासनाच्या योजना प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जलसंधारण विभागातील अभियंत्यांचे योगदान मोठे आहे. अभियंते समाजासाठी ज्या तळमळीने काम करतात त्यांची ती तळमळ टिकावी, त्यांच्या उत्साहाला प्रोत्साहन मिळावे यासाठी समाजाने देखील अभियंत्यांच्या पाठीशी उभा रहावे अशी अपेक्षा अभियंता यशवंत गवळी यांनी व्यक्त केली. 

हक्कासाठी लढणारी संघटना 
रस्ते, इमारत, जलसंधारण अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या अभियंत्यांना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी जिल्हा परिषद अभियंता संघटना जिल्हा प्रशासन व राज्य सरकार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. अभियंत्यांचा व त्यांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान व्हावा यासाठी जिल्हा परिषद अभियंता संघटना व जिल्हा परिषद अभियंता पतसंस्था कार्यरत आहे. समाजानेही अभियंत्यांप्रती आपलेपणाची भावना दाखविण्याची आवश्‍यकता असल्याची अपेक्षा जि. प. अभियंता संघटनेचे पंडित भोसले यांनी व्यक्त केली. 

राष्ट्रीय संपत्तीची काळजी घ्या 
महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या दुरदृष्टीतून साकारलेल्या उजनी प्रकल्पाच्या माध्यमातून भीमेचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले. ओसाड माळरानाचे नंदनवनात रुपांतर करण्यात शेतकऱ्यांच्या कष्टासोबतच अभियंत्यांचाही बौध्दिक कस पणाला लागला आहे. ही संपत्ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण स्वत:च्या मालमत्तेची जेवढी काळजी घेतो तेवढीच काळजी या राष्ट्रीय संपत्तीची आपण घ्यावी अशी अपेक्षा अभियंता प्रल्हाद कांबळे यांनी व्यक्ती केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The economic cycle of Solapur revolves around the skills of engineers