दूध, डाळिंब दर घसरणीने शेतकरी अडचणीत 

दत्तात्रय खंडागळे 
Saturday, 23 May 2020

मागणीअभावी डाळिंबाचे दर कमी 
बाजारपेठेतील डाळिंबाची मागणी घटल्याने डाळिंबाचा दर कमी झाला आहे. मोठ्या बाजारपेठेत डाळिंब म्हणावे तसे विक्री होत नसल्याने शेतकऱ्यांकडून आम्ही जास्त प्रमाणात माल खरेदी करत नाही. मागणीअभावी डाळिंबाचे दर कमी झाले आहे. 
- एम. डी. वझीराआलम, 
डाळिंब व्यापारी, झारखंड 

सांगोला (सोलापूर) : कोरोना पार्श्‍वभूमीवर सध्या दूध आणि डाळिंबाच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. डाळिंब सध्या 20 ते 40 रुपयेपर्यंत तर गायीचे दूध 20 ते 24 रुपये दराने खरेदी करण्यात येत आहे. कोरोनाच्या अगोदर डाळिंबाने शंभरी पार केली होती, तर दूध 35 ते 40 रुपये लिटर होते. 

डाळिंबाचे दर्जेदार अन्‌ विक्रमी उत्पादन 
दुष्काळ सांगोला तालुक्‍याच्या पाचवीला पूजलेला असतानाही उपलब्ध पाणीसाठा नियोजनबद्ध वापरून येथील शेतकरी डाळिंबाचे दर्जेदार आणि विक्रमी उत्पादन घेतात. कोरोनाने येथील डाळिंब व दूध उत्पादक शेतकरी सध्या कमालीचे अडचणीत आहेत. कोरोना महामारीने दर कमालीचे घसरल्याने हे दोन प्रमुख व्यवसाय तोट्यात आले आहेत. डाळिंब तसेच सर्वाधिक चारा छावण्या असलेला अशी सांगोला तालुक्‍याची ओळख. डाळिंब व दूध उत्पादनातून येथील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होतो. लॉकडाउनपूर्वी 100 ते 120 रुपये प्रतिकिलो असलेला डाळिंबाचा दर लॉकडाउननंतर खरेदीस व्यापारीच फिरकले नसल्याने 20 ते 40 रुपये प्रतिकिलो इतका घसरला. 

हेही वाचा : चिंता वाढली! कोरोनाने आज पुन्हा घेतला सहा जणांचा बळी; एकाच दिवशी आढळले 49 बाधित

दुधाची मागणी झाली कमी 
खरेदीसाठी व्यापारीच डाळिंब बागेकडे फिरकत नसल्याने परिणामी अनेक स्वप्ने रंगवलेल्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. दरात झालेल्या विक्रमी घसरणीने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च देखील हाती आला नाही. तशीच अवस्था येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांची झाली. लॉकडाउन दरम्यान दुधाची मागणी कमी झाल्याने प्रतिलिटर 35 ते 40 रुपये असलेला दर लॉकडाउनने अवघ्या 20 ते 25 रुपयांवर आला. उत्पन्न कमी झाले असले तरीही उत्पादन खर्च तेवढाच असल्याने पशुखाद्य, वैरण, मजुरी आदींचा विचार करता अनेक वर्षांपासून उदरनिर्वाहाचे साधन असलेला पशुपालन व्यवसाय अडचणीत आला. 

हेही वाचा : सोलापूर महापालिकेच्या उपायुक्तपदी डॉ. पंकज जावळे

देखभाल खर्च परवडत नाही 
माझ्याकडे 25 जर्सी गायी आहेत. कोरोना अगोदर मला जवळजवळ एक लाख रुपये बिल मिळत होते. परंतु, कोरोनानंतर सद्यस्थितीत 50 हजार रुपये हाती येत नाहीत. गायींचा देखभाल खर्च परवडत नाही. 
- राजू खंडागळे, 
पशुपालक, संगेवाडी 

दूध संकलनवर मोठा परिणाम 
आमचे दररोज गायी-म्हशीचे चार हजार लिटर दूध संकलन होत आहे. परंतु, सध्या कमी दरामुळे दूध संकलनवर याचा फार मोठा परिणाम होणार आहे. शासनाने दूध दराकडे लक्ष द्यावे. 
- कुंदन शिंदे, 
दूध संकलन केंद्र चालक 

आम्हाला मोठा आर्थिक तोटा 
पहिल्यावेळेस आमच्या डाळिंबास 88 रुपये प्रति किलो दर मिळाला. परंतु, कोरोनाने सध्या 30 रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. या परिस्थितीत आम्हाला फार मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. 
- आप्पासाहेब खंडागळे, 
डाळिंब उत्पादक शेतकरी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers are facing difficulties due to fall in milk and pomegranate prices