रत्नाई कृषी महाविद्यालयात शेतकऱ्यांना मिळाला कृषी माल निर्यातीचा मंत्र !

मिलिंद गिरमे 
Tuesday, 8 September 2020

"शेतकरी असंघटित आहेत, त्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांचा माल कवडीमोल दराने खरेदी करतो. अनेक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवले आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनो संघटित व्हा, असे आवाहन रत्नाई कृषी महाविद्यालयाचे कृषिदूत विलास वसेकर यांनी शेतकऱ्यांना केले. 

लवंग (सोलापूर) : निर्यातीतून मिळणारा खरा फायदा शेतकरी व शेतकरी गट तसेच ग्रामीण भागातील युवकांना कशाप्रकारे मिळू शकतो, यासाठी रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषी दूतांमार्फत आढीव येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कृषी माल निर्यात मंत्र देण्यात आला. 

हेही वाचा : अरेव्वा ! तंत्रस्नेही विद्यार्थिनी बनल्या ऑनलाइन शिक्षिका ! 800 मुलींनी घेतला सहभाग 

यामध्ये निर्यातीच्या कागदपत्रांमध्ये अपेडाचे रजिस्ट्रेशन कसे करावे, खात्रीलायक आयातदारांची निवड कशी करावी, निर्यातीसाठी शासनाच्या योजना तसेच सहाय्य करणाऱ्या संस्था, शेतकरी कंपनी कशाप्रकारे स्थापन करू शकतो, परकीय चलन प्राप्त करणे आदी विषयांवर रत्नाई कृषी महाविद्यालयाचे कृषिदूत विजय वसेकर यांनी मार्गदर्शन केले. "शेतकरी असंघटित आहेत, त्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांचा माल कवडीमोल दराने खरेदी करतो. अनेक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवले आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनो संघटित व्हा' असे आवाहन श्री. वसेकर यांनी शेतकऱ्यांना केले. आपण निर्यात केल्यास आपल्या कृषी मालास दुप्पट दर मिळेल व कोरोनामुळे डगमगलेली देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि लवकरच आपण शेतकरी कंपनी स्थापन करत आहोत, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. 

हेही वाचा : ऑनलाइन शिक्षणात शिक्षिकाच लई भारी! "एवढ्या' विद्यार्थ्यांच्या घरांपर्यंत पोचविले शिक्षण 

या शेतकरी कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराची संधी कशा प्रकारे मिळू शकते, हे श्री. वसेकर यांनी पटवून सांगितले. यासाठी रत्नाई कृषी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. कृषी दूत शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूजचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. डी. पी. कोरटकर व प्राचार्य आर. जी. नलावडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. एम. एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी एस. आर. आडत व प्रा. डी. एस. मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

शेतकऱ्यांनो संघटित व्हा 
कृषिदूत श्री. वसेकर म्हणाले, भारत हा कृषिप्रधान देश आहे. कृषी क्षेत्राची आपल्या देशाच्या जीडीपीमध्ये मोठी भूमिका आहे. सध्या देशात कोरोनाच्या संकटात कृषी क्षेत्रावर आर्थिक चलन अवलंबून आहे. देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यात कृषी क्षेत्र महत्त्वाची भूमिका साकारत आहे. एकट्या कृषी क्षेत्राने 3.4 विकासदर कायम राखला आहे. तरुणांनी सुद्धा निर्यात क्षेत्राकडे एक संधी म्हणून पाहून शेती क्षेत्रामध्ये काम करावे, नक्कीच आपले भविष्य उज्ज्वल असेल. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers get mantra of export of agricultural commodities in Ratnai Agricultural College