आता शेतमालाला मिळणार चांगला दर ! करमाळ्यातील केळी, पेरू किसान रेल्वेने दिल्लीला रवाना 

गजेंद्र पोळ 
Monday, 26 October 2020

करमाळा तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा शेतमाल केळी व पेरू जेऊर रेल्वे स्टेशनवरून किसान रेल्वेने दिल्ली बाजारपेठेत पाठवण्यात आला. जेऊर रेल्वे स्टेशनवर या मालाचे कृषिरत्न आनंद कोठडिया यांच्या हस्ते पूजन करून या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. 

चिखलठाण (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा शेतमाल केळी व पेरू जेऊर रेल्वे स्टेशनवरून किसान रेल्वेने दिल्ली बाजारपेठेत पाठवण्यात आला. जेऊर रेल्वे स्टेशनवर या मालाचे कृषिरत्न आनंद कोठडिया यांच्या हस्ते पूजन करून या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. 

हेही वाचा : सर्वांना वाटायचे खेळामुळे वाया जातो की काय ! मात्र, सर्वांना खोटे ठरवत आज ते आहेत पोलिस उपअधीक्षक 

किसान रेल्वे वाहतूक सुविधेमुळे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला चांगला दर मिळणे शक्‍य होणार असून, तालुक्‍यातील शेतकरी, गटशेती व शेतकरी उत्पादक कंपन्या यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोठडिया यांनी याप्रसंगी बोलताना केले. 

हेही वाचा : पांडुरंग साखर कारखान्याच्या सुरक्षिततेवर प्रश्‍नचिन्ह ! ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर कोसळली क्रेन 

कंदर येथील के. डी. एक्‍स्पोर्टचे किरण डोके यांच्या वतीने शेटफळ येथील केळी उत्पादक मुरलीधर पोळ यांची केळी व शेटफळ येथील लोकविकास फार्मर्स कंपनीचे विजय लबडे यांचा पेरू पहिल्या डब्यातून या सुविधेच्या माध्यमातून पाठवण्यात आला. करमाळा तालुक्‍यातून शेतमाल वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना सवलत मिळावी व पाठवण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती. ही सुविधा देण्यासाठी आजपर्यंत अनेकांनी प्रयत्न केले, त्यांचे या वेळी शेतकऱ्यांनी आभार मानले. यासाठी रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे, डॉ. रामदास भिसे, लक्ष्मीपुत्र अतनूर व सोलापूर विभाग मध्य रेल्वे यांचे सहकार्य मिळाले. 

या वेळी जेऊर रेल्वे स्टेशन येथे झालेल्या शुभारंभ प्रसंगी स्टेशन मॅनेजर सुनीलकुमार सिंग, इंजिनिअरिंग विभागाचे रामजी गुप्ता, किरण डोके, शेटफळचे सरपंच मुरलीधर पोळ, लोकविकास फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे विजय लबडे, गजेंद्र पोळ, प्रशांत नाईकनवरे, राजूशेठ गादिया, बळिराम जाधव, प्रदीप गव्हाणे, विठ्ठल रोंगे, तालुका कृषी विभागाचे रामभाऊ केकान, नानासाहेब बेरे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers from Karmala taluka were sent Banana and Gauva to Delhi by Kisan Railway