आई खाऊ देईना अन्‌ बाप भीक मागू देईना

Farmers in Solapur district again in crisis
Farmers in Solapur district again in crisis

सोलापूर : संकट काय शेतकऱ्यांना सोडायला तयार नाही. गेल्यावर्षी दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत होता. त्यानंतर पाऊस वेळेवर न आल्याने हवालदिल झाला. मात्र, शेवटच्या टप्प्यात समाधानकारक पाऊस झाल्याने समाधान व्यक्त केले जाऊ लागले. त्यातही काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नुकसान झाले. आशा परिस्थितीतून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच शेतकरी पुन्हा कोरोना व्हायरसच्या कचाट्यात सापडला आहे. ‘आई खाऊ देईना अन्‌ बाप भीक मागू देईना’, अशी सध्या त्याची स्थिती निर्माण झाली आहे.
कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला आहे. भारतातही त्याची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन किती दिवस राहील याचा अंदाज कोणालाही येत नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांनाही बसत आहे. गेल्यार्षी पाऊस न झाल्याने सोलापूर जिल्ह्यात खरीप आणि रब्बी अशा दोन्ही पेरण्या झाल्या नव्हत्या. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना विकतचे धान्य घेण्याची वेळ आली होती. त्यानंतर जून- जुलैमध्ये चांगला पाऊस पडेल या आशेने शेतकऱ्यांनी उधारीवर शेतीची मशागत, बी-बियाणे खरेदी करून पेरणी केली. मात्र, तेव्हाही पावसाने हुलकावणी दिली आणि पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला. 

हेही वाचा : अरे बाप रे? आपल्याला काय व्हतंय म्हणणाऱ्या वाड्या, वस्त्याही भेदरल्या
पाण्याचा प्रश्‍न

गेल्यावर्षी उन्हाळ्यात जिल्ह्यात सर्वत्र टँकरने पाणी पुरवठा सुरू होता. त्याला सुद्धा काही ठिकाणी पाणी भरण्यासाठी नव्हते. करमाळा तालुक्यात तर ४०- ४५ किलोमीटरवरून टँकरने पाणी नेले जात होते. सावडी एका टोकाचे गाव आणि आळजापूर हे दुसऱ्या टोकाचे गाव. अशा स्थितीत सावडी येथून आळजापूरला पाणी जात होते. 

जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न
गेल्यावर्षी दुष्काळामुळे जनावरांना चाराही टाकायला नव्हता. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रशासनाने चारा छावण्या सुरू केल्या होत्या. चारा उपलब्ध होत नसल्याने अहमदनगर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यातून चाऱ्याच्या गाड्या जात होत्या. उजनी पट्ट्यात गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात हिरवा चारा तयार केला होता. जिल्हा प्रशासनाने यासाठी पुढाकार घेतला होता. यावर्षी जनावरांना चारा मोठ्या प्रमाणात आहे. 

हेही वाचा : 2003 मधील सार्स, 2012 मधील मर्स अन्‌ आता... 
पावसाची हुलकावणी अन्‌ नुकसान

गेल्यावर्षी सुरवातीला पावसाने हुलकावणी दिली होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात पाऊस पडला. त्यामुळे तलाव, ओढे, नाले, नदीला पाणी आले होते. काही ठिकाणी तर महापुराचा फटका बसला होता. त्यामुळेही शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जास्त पाऊस झाल्यानेही शेतीचे नुकसान झाले होते. त्यामुळे पावसाळ्यात शेतकऱ्यांना सुरवातीला पाऊस कधी येईल याची वाट पहावी लागली आणि त्यानंतर शेवटी पावसाने थांबावे, असे वाटू लागले होते.

आता कोरोना 
कोरोनामुळे शेतीवर संकट आले आहे. सुगीच्या दिवसातच कोरोनाने धुमाकूळ घातला. लॉकडाऊनमुळे अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा रुग्ण सापडला तेव्हा ज्वारीची मळणी, गहू, हरभरा काढण्याची कामे सुरू होती. कोरोनाच्या भीतीने मजूरसुद्धा मिळण्यास अडचणी आल्या. शेतमाल विकल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे येतात. मात्र, शेतमाल कुठे विकायचा असा प्रश्‍न त्यांच्यापुढे आहे. दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. कमी दिवसात आणि उन्हाळ्यात कलिंगड आणि खरबूज जादा पैसे मिळवणारे पीक म्हणून अनेक शेतकऱ्यांनी त्याची लागवड केली. मात्र, ऐन विक्रीत त्याला ग्राहक मिळत नाही. त्यामुळे शेतात सडून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. केळीची सुद्धा अशीच स्थिती आहे. उसाला पर्यांय म्हणून शेतकरी केळीकडे वळाला. त्यातून मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यात केळीची लागवड होत आहे. ही केळी देशाबाहेर विक्रीसाठी जाते. परंतु लॉकडाऊन असल्याने केळी जनावरांना टाकण्याची वेळ आली आहे. शेतीला पर्याय म्हणून अनेक शेतकऱ्यांनी पोल्ट्री केली. पण सुरवातीच्या काळात कोंबड्यांमुळे कोरोना होतो, अशी अफवा पसरली त्यामुळे तोही व्यवसाय तोट्यात गेला. भाजीपालाही मोठ्या प्रमाणात घेतला जातो. त्याच्यावरही कोरोनाचा परिणाम झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com