हुतात्मा धनंजय होनमाने अमर रहे... अमर रहे...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 May 2020

कुटुंबीयास एक कोटी 38 लाख रुपयांच्या मदतीचे आश्‍वासन 
हुतात्मा धनंजय होनमाने यांच्या कुटुंबीयाचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सकाळी त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबीयास एक कोटी 38 लाख रुपये, आई-वडिलांना पेन्शन आणि त्यांच्या भावाला शासकीय नोकरी देण्याचे आश्‍वासन पालकमंत्र्यांनी दिले. 

पंढरपूर (जि. सोलापूर) : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्‍यातील जंगलात नक्षलवाद्यांशी लढताना पोलिस उपनिरीक्षक धनंजय होनमाने रविवारी (ता. 17) सकाळी हुतात्मा झाले होते. त्यांच्या पार्थिवावर आज मूळ गावी पुळूज (ता. पंढरपूर) येथे शासकीय इतमामात आणि शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी हुतात्मा धनंजय होनमाने अमर रहे... अमर रहे अशा घोषणा देऊन वीरपुत्राला अखेरचा निरोप दिला. पुळूज ग्रामस्थांना व उपस्थितांना यावेळी आश्रू अनावर झाले होते. 
आज दुपारी साडेबारा वाजता हुतात्मा पोलिस उपनिरीक्षक धनंजय होनमाने यांचे पार्थिव त्यांच्या घरी आणण्यात आले. अंत्यदर्शन घेतल्यानंतर येथील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हुतात्मा धनंजय होनमाने यांचे मोठे बंधू विकास होनमाने यांनी मुखाग्नी दिला. 
यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके, आमदार यशवंत माने आदींनी हुतात्मा धनंजय होनमाने यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. शासनाच्या वतीने हुतात्मा धनंजय होनमाने यांना श्रद्धांजली वाहिली. नक्षलवाद्यांशी लढताना हुतात्मा होनमाने यांनी दाखविलेले शौर्य महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. त्यांच्या बलिदानाची जाणिव प्रत्येकास असेल, अशा शब्दांत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी श्रद्धांजली वाहिली. तसेच शासनाकडून सर्व प्रकारची मदत कुटुंबीयास केली जाईल, असे त्यांनी याप्रसंगी सांगितले. 
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, तहसीलदार वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, पोलिस निरीक्षक किरण अवचर, अरुण पवार, प्रशांत भस्मे यांनी पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. 
यावेळी उपस्थितांनी धनंजय अमर रहे ..अमर रहे अशा घोषणा देऊन वीरपुत्राला अखेरचा निरोप दिला. पोलिस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांनी शासनाच्या आणि पोलिस दलाच्या वतीने शोकसंदेश वाचून दाखवला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Funeral of martyr Dhananjay Honmane in Puluj