बार्शीच्या गणेश मंडळाची सामाजिक बांधिलकी ! पीपीई किट, तांदूळ वाटपासह राबविले विविध उपक्रम 

प्रशांत काळे
Tuesday, 1 September 2020

बार्शीच्या सुभाषनगर भागातील श्री गणेश क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवून आठ दिवस वेगवेगळे उपक्रम घेऊन गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयास पीपीई किट, राजमाता इंदूताई आंधळकर अन्न छत्रालयास तांदूळ, सेंद्रीय खत वाटप, वृक्षारोपण, मास्क व अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप, रक्तदान शिबिर असे विविध कार्यक्रम राबवले आहेत. 

बार्शी (सोलापूर) : संपूर्ण देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाने मागील पाच महिने जनतेला लॉकडाउनच्या खाईत लोटलेले आहे. गुढी पाडव्यापासून ते गणेश उत्सवापर्यंत अनेक सण घरीच साजरा करण्याची वेळ प्रत्येकावर आली आहे. यातूनही सामाजिक बांधिलकी जपत बार्शीच्या गणेश क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने गणेश उत्सव काळामध्ये विविध उपक्रम राबवून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. 

हेही वाचा : बार्शी तालुक्‍यात कोरोनाचा कहर सुरूच; दोन दिवसांत 153 बाधित 

या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास शासनाची मनाई होती. प्रत्येक गणेश उत्सव मंडळातील कार्यकर्त्यांच्या मनात वर्षातून एकदा होणारा उत्सव साजरा होत नसल्याची खंतही होती. पण सामाजिक उपक्रमातून जनतेला मदत केली पाहिजे, ही भावना मंडळाच्या टीमने व्यक्त केली. सुभाषनगर भागातील श्री गणेश क्रीडा व सांस्कृतिक मंडळ मागील पंधरा वर्षांपूर्वी स्थापन झाले असून, या मंडळाच्या सर्व ज्येष्ठांनी आता तरुणांच्या हातात मंडळाची सूत्रे दिली आहेत. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवून आठ दिवस वेगवेगळे उपक्रम घेऊन गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयास पीपीई किट, राजमाता इंदूताई आंधळकर अन्न छत्रालयास तांदूळ, सेंद्रीय खत वाटप, वृक्षारोपण, मास्क व अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप, रक्तदान शिबिर असे विविध कार्यक्रम राबवले आहेत. शासनाची प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असल्याने मंडळाने एक हजार कापडी पिशव्या तयार करून पोलिस ठाणे ते गांधी पुतळा चौकपर्यंत एका कार्यकर्त्यास श्री गणेश वेषभूषेमध्ये तयार करून त्याच्या हस्ते कापडी पिशव्यांचे वाटप केले. 

हेही वाचा : सोलापूरकरांचे स्वप्न पूर्ण झाले, उजनी 100 टक्के भरले 

देखावा उभा न करता सामाजिक कार्य केल्याबद्दल 2018 मध्ये मंडळाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी मंडळाचे कौतुक केले होते. विशेष म्हणजे यावर्षी मंडळाने कोणासही वर्गणी मागितली नाही. अध्यक्ष नागेश सुरवसे, उपाध्यक्ष प्रशांत घोडके, गणेश लांडगे, सोनू तांबे, शुभम राजपूत, गणेश भोकरे, दत्ता कांबळे, अमोल गायकवाड, रत्नदीप सुरवसे, लखन देशमुखे, राम क्षीरसागर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन या गणेशोत्सवात उपक्रम राबवले आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Mandal of Barshi celebrated Ganeshotsav with various social activities