जड अंत:करणाने निघाल्या ज्ञानोबा-तुकोबांच्या पादुका परतीच्या प्रवासाला 

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 2 जुलै 2020

यंदा कोरोनामुळे आज द्वादशी दिवशीच संतांच्या पादुका घेऊन आलेल्या बसमधून संबंधित पदाधिकारी आणि वारकरी मंडळींना परतीच्या प्रवासाला निघावे लागले. "बा विठ्ठला, कोरोनाचे संकट दूर कर आणि पुढील वर्षी परंपरेप्रमाणे मोठ्या थाटामाटात लाखो वारकऱ्यांसह आम्हाला पंढरपूरला येण्याची संधी मिळू दे,' असे साकडे घालून जड अंतःकरणाने या सर्व लोकांनी पंढरपूरचा निरोप घेतला. 

पंढरपूर (सोलापूर) : श्री विठ्ठल मंदिरात आज संत-देवभेटीचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने झाला. दरवर्षी आषाढी पौर्णिमेला होणारा हा सोहळा यंदा प्रथमच कोरोनामुळे आषाढी द्वादशीला करावा लागला. या सोहळ्यानंतर संतांच्या पादुकांसह आलेल्या विठ्ठलभक्तांनी बसमधून जड अंतःकरणाने परतीचा प्रवास सुरू केला. 

हेही वाचा : रविवारी जनता कर्फ्यू : कुठे? वाचा सविस्तर 

पंढरपूरला वारंवार येणे, पंढरपूर क्षेत्रात राहणे म्हणजे वारी करणे. श्री विठ्ठल मूर्तीरूपाने मंदिरात आहे. तीर्थरूपाने चंद्रभागेत आहे आणि क्षेत्ररूपाने तो संपूर्ण पंढरपूर शहरात आहे, अशी भाविकांची भावना आहे. पूर्वी श्री विठ्ठल मंदिराकडे जाणारे रस्ते अरुंद होते. त्यामुळे आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला येणाऱ्या संतांच्या पादुकांपैकी संत एकनाथ महाराजांच्या पादुकांचा अपवाद वगळता बहुतांश संतांच्या पादुका श्री विठ्ठल मंदिरात भेटीसाठी घेऊन जात नसत. 1996 मध्ये श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे तत्कालीन अध्यक्ष हभप विवेकानंद महाराज वासकर, अनिलकाका बडवे, शंकर महाराज बडवे यांची चर्चा झाली. यात्रेसाठी अनेक ठिकाणांहून संतांच्या पादुका पंढरपुरात आणल्या जातात. परंतु, त्या विठ्ठल मंदिरात जात नाहीत. हे लक्षात घेऊन देव आणि संतांच्या पादुकांचा सोहळा मंदिरात करण्याची प्रथा विवेकानंद महाराज वासकर यांच्या पुढाकारातून सुरू झाली. आषाढी पौर्णिमेदिवशी गोपाळ काल्याला जाताना किंवा येताना विविध संतांच्या पादुका श्री विठ्ठल मंदिरात नेण्याची प्रथा सुरू झाली. 

हेही वाचा : कोरोनासोबत एकटा नव्हे तर कुटुंबीयांसह लढतोय डॉक्‍टर! 

यंदा कोरोनाच्या संकटामुळे शासनाने परवानगी दिलेल्या संतांच्या पादुका पौर्णिमेपर्यंत पंढरपुरात न ठेवता द्वादशीदिवशी परतीच्या प्रवासाला निघाव्यात यादृष्टीने शासनाने नियोजन केले होते. काही संस्थांनी पौर्णिमेपर्यंत पंढरपुरात पादुका ठेवण्याची परवानगी देण्याची मागणी केली होती. परंतु, त्यास परवानगी मिळाली नाही. श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीने देव आणि संतभेटीच्या सोहळ्याचे आज चांगले नियोजन केले होते. प्रत्येक संस्थानला भेटीची आणि नैवेद्य दाखविण्याची वेळ ठरवून देण्यात आली होती. त्यानुसार आज संत एकनाथ महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, श्री सांगावटेश्वर देवस्थान, संत सोपानदेव महाराज, संत मुक्ताबाई, श्री विठ्ठल-रखुमाई संस्थान क्षेत्र कौंडण्यपूर, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत नामदेव महाराज या संतांच्या पादुका क्रमाने श्री विठ्ठल मंदिरात नेण्यात आल्या. हरिनामाच्या जयघोषात श्री विठ्ठल- रुक्‍मिणीच्या मूर्तींना या पादुका भेटवण्यात आल्या. मंदिर समितीच्या वतीने पादुका घेऊन आलेल्या लोकांना प्रसाद वाटप करण्यात आला. 

जड अंतःकरणाने दिला निरोप 
दरवर्षी आषाढी पौर्णिमेला होणारा हा सोहळा झाल्यानंतर सायंकाळी ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू होत असतो. शेकडो पंढरपूरकर निरोप देण्यासाठी इसबावी येथील विसावा मंदिरापर्यंत चालत जात असतात. यंदा मात्र आज द्वादशी दिवशीच संतांच्या पादुका घेऊन आलेल्या बसमधून संबंधित पदाधिकारी आणि वारकरी मंडळींना परतीच्या प्रवासाला निघावे लागले. "बा विठ्ठला, कोरोनाचे संकट दूर कर आणि पुढील वर्षी परंपरेप्रमाणे मोठ्या थाटामाटात लाखो वारकऱ्यांसह आम्हाला पंढरपूरला येण्याची संधी मिळू दे,' असे साकडे घालून जड अंतःकरणाने या सर्व लोकांनी पंढरपूरचा निरोप घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gyanoba-Tukobas Paduka returned with a heavy heart