सांगोला तालुक्‍यात एका रात्रीत 240 मिमी पाऊस; नातेपुते परिसरात वादळ-वाऱ्याने मोठे नुकसान 

Haevy Rain
Haevy Rain

सांगोला (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यात रविवारी (ता. 6) रात्री अचानक विजांच्या कडकडाटासह सर्वदूर 240 मिलिमीटर पाऊस झाला. तालुक्‍यात सरासरी 26.66 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस ज्वारी पेरणीसाठी उपयुक्त ठरणार असला तरी तालुक्‍यातील फळबागांसाठी रोगकारक ठरणार आहे. 

गेले दोन दिवस सांगोला तालुक्‍यात वातावरणात मोठी उष्णता जाणवत होती. कडाक्‍याचे पडणारे ऊन आणि अचानक ढगाळ वातावरण निर्माण होत होते. रविवारी दिवसभरही शहर व ग्रामीण भागातील नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. रात्री अकराच्या सुमारास तालुक्‍यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. हा पाऊस ज्वारी पेरणीसाठी उपयुक्त समजला जातो. परंतु तालुक्‍यात या अगोदरही सतत झालेल्या अवकाळी पावसामुळे डाळिंब, द्राक्ष व इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सध्या सतत होणाऱ्या वातावरण बदलामुळे डाळिंबावर फूलगळती व तेलकट रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. द्राक्ष बागेवरही दावण्या रोगाचे संकट हटेनासे झाले आहे. बोर बागांवर सध्या भुरी रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. तालुक्‍यातील कोळा मंडलमध्ये सर्वाधिक 52 मिमी व सोनंद मंडलमध्ये सर्वात कमी सात मिमी पावसाची नोंद झाली. तालुक्‍यात एकूण 240 मिमी पाऊस झाला असून सरासरी 26.66 मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती तहसीलदार योगेश खरमाटे यांनी दिली. 

सांगोला तालुक्‍यातील मंडलनिहाय पाऊस 
सांगोला - 32 मिमी, हातीद - 9, नाझरे - 20, महूद - 40, संगेवाडी - 42, सोनंद - 7, जवळा - 9, कोळा - 52, शिवणे -39. एकूण 240 मिलिमीटर आणि सरासरी 26.66 मिमी पावसाची नोंद झाली. 

वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने नातेपुते परिसरात नुकसान 
नातेपुते : माळशिरस तालुक्‍यात रविवारी रात्री आठ ते पहाटे 3.30 पर्यंत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसाने खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. 
गेल्या चार दिवसांत दिवसभर प्रचंड ऊन व उकाडा होता. रविवारी रात्री पावसाला सुरवात झाली. या पावसामुळे मका, बाजरी, सोयाबिनचे मोठे नुकसान झाले आहे. ऊस, केळी, कडवळ, मका आदी जनावरांची खाद्यपिके यांची वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मोठी पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी पिकांनी जमिनीवर लोळण घातली आहे. फळबागांमध्येही पडझड झाली आहे. द्राक्ष, डाळिंब यांचे नुकसान तुलनेने कमी झाले आहे. माळशिरस तालुक्‍यात आजअखेर सरासरी 500 मिमी पाऊस झाला असून 21 सप्टेंबरपर्यंत पाऊस पडणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. 

तालुक्‍यात झालेला पाऊस (मिलिमीटर) : अकलूज - 106.25, दहिगाव 39.75, इस्लामपूर - 86.75, लवंग - 15.25, महाळुंग - 89.75, माळशिरस - 72.5, नातेपुते - 77.75, पिलीव - 88.75, सदाशिवनगर - 75.5, वेळापूर - 94. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com