'व्हॅलेंटाइन डे'ला पंढरपुरात गुलाबाचा तुटवडा

भारत नागणे
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

एक हजार गुलाब पेंड्यांची आवक 
दरम्यान, आज गुलाब फुलांना मागणी वाढल्याने फुलांचे दर वाढले. अधिकचा दर देऊनही दुपारनंतर फुलांचा तुटवडा जाणवला. एरवी येथील फूलबाजारात एका पेंडीला 25 रुपयांचा भाव मिळतो. तर आज हाच भाव 40 रुपयांपर्यंत गेला होता. येथील फूलबाजारात आज जवळपास एक हजार गुलाब पेंड्याची आवक झाली होती. व्हॅलेंटाइन डे आणि लग्नसराईमुळे बाजारात फुलांना मागणी होती. मागणी अधिक वाढल्याने फुलांचा तुटवडा होता. आज गुलाब फुलांना अधिकचा दर मिळाल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

पंढरपूर (जि. सोलापूर) : पंढरपूर शहर व परिसरात आज व्हॅलेंटाइन डे उत्साहात साजरा करण्यात आला. विशेषतः तरुण-तरुणींनी आज एकमेकांना गुलाबपुष्प देऊन प्रेम व्यक्त केले. दरम्यान, गुलाब फुलांना मागणी वाढल्याने पंढरपुरात गुलाब फुलांचा तुटवडा जाणवला. दररोज दोन रुपयांना विकले जाणारे गुलाब आज चार ते पाच रुपयांना विकले गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना आज अधिकचे उत्पन्न मिळाले. त्या आनंदात शेतकऱ्यांनीही घरच्या लक्ष्मीला अधिकचे मिळालेले पैसे आणि शेतीतील गुलाब देऊन प्रेम व्यक्त केले. 

हेही वाचा - सीमेबाहेरील डॉ. विकास आणि गुरवीन यांचे प्रेम 

आज अनेकांनी आपापल्या जिवाभावाच्या नात्यावर प्रेम व्यक्त करत व्हॅलेंटाइन डे उत्साहात साजरा केला. पाश्‍चात्त्य संस्कृतीत अधिक रुजलेला हा दिवस आता आपल्याकडे शहराबरोबरच खेड्यापाड्यातही तितक्‍याच उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो. आज अनेक प्रेमीयुगलांनी प्रेमाचे प्रतीक असलेले गुलाबाचे फूल देऊन आपल्या प्रियसीला प्रपोज केले तर काही तरुणांनी चक्क आई-वडिलांना गुलाबपुष्प देऊन त्यांच्यावरचे प्रेम व्यक्त केले. काही ऑफिसमध्ये कामावर जाणाऱ्या नोकरदार मंडळींनीही सकाळी उठल्या उठल्या आपल्या गृहलक्ष्मीला गुलाब देऊन प्रेम व्यक्त केले. 

हेही वाचा - मैत्री आणि प्रेम 

शाळा, कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मित्र-मैत्रिणींनी देखील मैत्रीचा धागा अधिक घट्ट व्हावा या भावनेतून गुलाब देऊन मित्रत्वाचे प्रेम व्यक्त केलं. शेतात कष्ट करणाऱ्या बळिराजानेही आपल्या याच भावनेतून काळ्या आईवरही प्रेम व्यक्त केलं. कोर्टी येथील गुलाब उत्पादक शेतकरी नवनाथ बनसोडे यांनी गुलाब विक्रीला घेऊन येण्यापूर्वी पहिले गुलाबपुष्प काळ्या आईच्या चरणी वाहून शेतीवरचं प्रेम व्यक्त केलं. असा आजचा आगळावेगळा प्रेमदिवस पंढरपूर शहर व परिसरातील अनेक गावांमध्ये उत्साहात आणि शांततेत साजरा केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: High Demand for roses and less supply for Valentines Day in Pandharpur