आईबाबा अन्‌ लेकराबाळांसाठी उदबत्ती तर विकलीच पाहिजे 

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 22 मे 2020

मार्च महिन्यापासून लॉकडाउनमुळे त्यांचा धंदा बंद झाला. घरात बसून राहण्याची वेळ आली. कुटुंबातील सर्व म्हणजे सात लोकांना खाऊपिऊ घालण्याची अडचण निर्माण झाली. हाताशी असलेली रक्कम अपुरी पडू लागली

सोलापूर : लॉकडाउनमध्ये कमाई नसल्याने होती तेवढी भांडवलाची रक्कम खाण्यापिण्यावर खर्च करावी लागली. कमाई बंद व भांडवल गेल्याने सगळा धंदा मोडण्याची वेळ आली. आता व्याजाने पैसे घेऊन पुन्हा धंद्याला सुरवात केली तर गिऱ्हाईक मिळेनासे झाले आहेत, अशी भावना शरद कोळेकर यांनी व्यक्त केली. 
श्री.कोळेकर हे आमराई भागात राहतात. गेल्या 13 वर्षांपासून सायकलवर उदबत्त्यांची पाकिटे घेऊन त्याची विक्री करतात. त्यांच्या कुटुंबामध्ये वृद्ध आईवडील, पत्नी, एक शाळकरी मुलगा, 15 महिन्यांचे बाळ व शाळेत शिकणारा भाऊ एवढा परिवार आहे. घरात शरद कोळेकर हे एकमेव कमावते आहेत. 

हेही वाचा : परप्रांतीयांना घेऊन निघाली पटणा येथे श्रमीक एक्‍सप्रेस 

मार्च महिन्यापासून लॉकडाउनमुळे त्यांचा धंदा बंद झाला. घरात बसून राहण्याची वेळ आली. कुटुंबातील सर्व म्हणजे सात लोकांना खाऊपिऊ घालण्याची अडचण निर्माण झाली. हाताशी असलेली रक्कम अपुरी पडू लागली. मग खेळत्या भांडवलाची रक्कम घरखर्चासाठी त्यांनी वापरली. कसेबसे दोन महिने काढताना जवळ असलेले सर्व पैसे संपले. 
मात्र, आता घराबाहेर पडून घरखर्चासाठी उदबत्त्या विकण्याशिवाय कोणताच पर्याय राहिला नाही. मालाची खरेदी करण्यासाठी पैसे राहिले नाहीत. शेवटी त्यांनी खासगी कर्ज घेऊन थोडीफार भांडवलाची रक्कम गोळा केली. त्यातून काही माल भरला. पण वाहतूक बंद असल्याने सर्व प्रकारच्या उदबत्त्या देखील पुरेशा प्रमाणात मिळाल्या नाहीत. ज्या काही उदबत्त्या घेऊन ते सायकलवर विकण्यास निघाले. पण मंदिरे बंद असल्याने ग्राहक देखील अगदीच कमी झाले आहेत. मागील पाच दिवसांपासून ते कसेबसे काही माल विकून कारभार चालवत आहेत. लॉकडाउनपूर्वी 300 ते 400 रुपये कमाई त्यांना व्हायची. आता ग्राहक नसल्याने त्यांची रोजची कमाई 50 ते 100 रुपयांवर आली आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Incense for parents and children must be sold